नवी मुंबई: पोटच्या मुलानेच आपल्या ६५ वर्षीय आईचा गळा आवळून आणि फरशीवर डोके आपटून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना वाशी येथील सेक्टर ११ मध्ये घडली. वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महेश कदम (४२) याला काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.
मृत नंदा कदम (६५) जुहूगाव येथील अष्टविनायक सोसायटीत तिसऱ्या मजल्यावर रूम नं. ३०३ मध्ये राहत होत्या. याच घरात त्यांचा मुलगा महेश कदम, त्याची पत्नी आणि मुलांसह राहत होते.नंदा कदम यांचे घरगुती कारणावरून आपल्या सुनेसोबत नेहमी भांडण होत होते.
आई आपल्या पत्नीला महत्त्व न देता ती केवळ बहिणीला महत्त्व देऊन तिचा संसार पाहत असल्याचा महेशचा समज झाला होता. या कारणावरून मायलेकामध्ये नेहमीच वाद होत होता. रविवारी सायंकाळीदेखील कौटुंबिक कारणावरून भांडण झाले.
ते विकोपाला गेल्यानंतर महेशने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने आईचा गळा कपड्याने आवळला. तिचे डोके फरशीवर आपटले. गंभीर जखमी झालेल्या आईचा जागीच मृत्यू झाला. वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.