नेरूळ : स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईतील सेक्टर आणि नोड भागांमध्ये गल्ली-बोळात स्वतंत्र होळ्या पेटवल्या जात असल्या, तरी गावागावांत ‘एक गाव, एक होळी’ ही परंपरा कायम आहे. होळी सण सात दिवसांवर आला असताना या पारंपरिक होळीच्या तयारी सुरू असून वातावरण उत्साहाने भरले आहे.
‘जायफल टेंगता उन्गवला दवणा, दवणा नाय गो दवण्याची कारी...’ हे पारंपरिक गीत कानावर पडताच आगरी-कोळी समाजात होळीची लगबग सुरू झाल्याचे समजते.
नवी मुंबईतील दिवाळे- कोळीवाड्याची होळी ही शहरातील सर्वात मोठी आणि पारंपरिक होळी म्हणून ओळखली जाते. येथे मोठ्या प्रमाणात समाजबांधव एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. होड्या-बोटींची पूजा केली जाते. उपजीविकेप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
कोळी समाजासाठी होळी हा दिवाळीनंतरचा दुसरा महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी मच्छीमार आपल्या उपजीविकेचे साधन असलेल्या होड्या व बोटींची पूजा करतात. त्यांना रंगरंगोटी करून नववधूप्रमाणे सजवले जाते. समुद्राशी असलेले नाते आणि निसर्गाबद्दलची कृतज्ञता यामागे व्यक्त होते.
काही गावांमध्ये होळीच्या आदल्या दिवशी बँडच्या तालावर सोंग काढण्याची परंपरा आजही कायम आहे, तर काही ठिकाणी होळीच्या दिवशी पारंपरिक वेशभूषेत नाचत गावातून मिरवणूक काढली जाते. ढोल-ताशांच्या गजरात तरुणाई आणि ज्येष्ठ मंडळी एकत्र नृत्य करत उत्सवाचा आनंद लुटतात. पूजेचा मान गावच्या पाटलांच्या घरातील महिलेला दिला जातो. होळी पेटवल्यानंतर सर्वप्रथम नवदाम्पत्य प्रदक्षिणा घालते. त्यानंतर गावकरी कुटुंबासह होळीला नारळ आणि ऊस अर्पण करतात. होळीच्या राखेचा टिळा कपाळी लावून शुभेच्छांची देवाणघेवाण केली जाते.
सायंकाळी महिलावर्ग होळीभोवती फेर धरून पारंपरिक गीते गातात. या गीतांमधून लोकजीवन, नाती, श्रद्धा आणि सांस्कृतिक इतिहास जिवंत राहतो.
आगरी-कोळी बोलीभाषेत होळीला ‘हावलूबायचा सण’, तर रंगपंचमीला ‘शिमगा’ असे संबोधले जाते. हा सण समाजात एकोप्याचे प्रतीक मानला जातो. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण यात उत्साहाने सहभागी होतात.
होळी उत्सवातील एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे नवविवाहित जोडप्याचा सन्मान. गावात ज्या मुलींची अलीकडेच लग्ने झाली असतात त्या नवदाम्पत्याला विशेष मान देत जावईबापूंचा जाहीर सत्कार केला जातो.