Stamp Paper Pudhari
मुंबई

Stamp Paper Campaign Mumbai: आश्वासनं नकोत, लेखी हमी द्या! नवी मुंबईत स्टॅम्प पेपर मोहीम

‘सजग नागरिक मंच’चा उमेदवारांना थेट जाब

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : निवडणुका जवळ आल्या की आश्वासनांची खैरात आणि विकासाच्या गप्पा मारणाऱ्या उमेदवारांना आता नवी मुंबईतील मतदारांनी कायदेशीर पेचात पकडले आहे. नवी मुंबईत वेगळेच ‌‘हटके‌’ जनआंदोलन सुरू आहे. ‌‘खोट्या शब्दांना आता पूर्णविराम... 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जो विकासनामा लिहून देईल, त्यालाच आमचे मत‌’ अशी भूमिका सजग नागरिक मंच संस्थेने घेतली आहे.

मतदारांनी उमेदवारांकडून थेट 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कामांची लेखी हमी घेण्याची मोहीम सुरू केली असून शहरात या मागणीची चर्चा आहे. ‌‘वचनं नको, कागदावर सही हवी‌’ या सजग नागरिक मंचाने लावलेल्या बॅनरने खळबळ उडवली आहे.

या मोहिमेअंतर्गत मतदारांनी उमेदवारांसमोरविकासकामे केवळ नागरिकांच्या मागणीनुसारच व्हावीत, नगरसेवक निधीचा प्रत्येक रुपया कुठे खर्च झाला, याचे तपशील वेबसाईटवर सार्वजनिक करणे, कामाचा दर्जा आणि खर्चाबाबत मतदारांसमोर उत्तरदायी राहणे, स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या नावे पालिकेची कंत्राटे घेण्यास पूर्ण बंदी, करदात्यांच्या पैशाचा अपव्यय टाळून दर्जेदार रस्ते आणि सुविधांची हमी, सरकारी शाळा आणि रुग्णालयांच्या सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य, बदल आता केवळ कागदावर नाही, तर कृतीत हवा, अशा सहा अटी ठेवल्या आहेत.

लोकशाही म्हणजे केवळ पाच वर्षांतून एकदा बटण दाबणे नव्हे, तर पाच वर्षे लोकप्रतिनिधीला कर्तव्याच्या चौकटीत जखडून ठेवणे होय. शब्दांचे बुडबुडे हवेत विरून जातात, पण कागदावरची शाई पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करते. आज आम्ही राजकीय पक्षांना निवडणूक नव्हे, तर उत्तरदायित्वाच्या परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन करत आहोत. ज्यांना आपल्या कर्तृत्वाची खात्री आहे, त्यांनी स्टॅम्प पेपरवर यावे; अन्यथा मतदारांच्या घराचे उंबरठे ओलांडण्याचे धाडस करू नये. स्मार्ट शहराला खोटे आश्वासने देणारे नव्हे तर ‌‘जबाबदार‌’ नगरसेवक हवे आहेत.
सुधीर दाणी, प्रवर्तक, सजग नागरिक मंच, नवी मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT