नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-मनसे शिवशक्तीचा कर्तव्यनामा बुधवारी जाहीर करण्यात आला. शहराचा विकास सध्या ठेकेदारांच्या सल्ल्यानुसार आणि अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मर्जीनुसार होत आहे. मात्र यापुढे कोणतीही विकासकामे करताना प्रत्येक वॉर्डमध्ये सर्वसामान्य नागरिकांची वॉर्डसभा घेऊन त्यांना पसंत असलेली कामेच केली जातील, असा शब्द या कर्तव्यनाम्यातून देण्यात आला.
वाशी येथील मर्चंट जिमखाना येथे आयोजित समारंभात शिवसेना-मनसे शिवशक्तीचा कर्तव्यनामा जाहीर करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, मनसेचे विक्रांत माने, विलास घोणे आदी उपस्थित होते.
ठाकरे सरकारच्या काळात नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागला. मात्र आता या पुनर्विकासात राजकीय दलालांच्या टोळ्यांनी घुसखोरी केली आहे. या दलालांनाही चाप लावण्याचे काम करण्यात येणार आहे. आरोग्य सेवेचे बजेट 230 कोटींवरून 500 कोटींपर्यंत वाढून आरोग्य सेवा मोफत देण्यात येणार आहे. ही केवळ आश्वासने नसून ठाकरेंचा शब्द आहे आणि हा दिलेला शब्द कर्तव्य म्हणून पाळला जाणार असल्याची ग्वाही या कर्तव्यनाम्यात देण्यात आली.
नवी मुंबई शहर हे सुनियोजित असले तरी महापालिकेची आरोग्य सेवा दुबळी आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना आरोग्य सेवेसाठी मुंबईवर अवलंबून राहावे लागते. मात्र शिवसेना-मनसेची सत्ता आल्यानंतर आरोग्य सेवेचे बजेट दुपटीने वाढविण्यात येईल. बंद असलेली सर्वच रुग्णालये तातडीने सुरू केली जाणार आहेत. ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र त्यातील एक टक्काही पर्यटक नवी मुंबईत येत नाही. त्यामुळे नवी मुंबईत जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ निर्माण करण्यात येणार असून, छत्रपती संभाजी महाराज यांचा 111 फूट उंच पूर्णाकृती पुतळाही उभारला जाणार असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले.