नवी मुंबई: नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात महासभेच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेल्या कथित 'दादागिरी' आणि विकासकांच्या कोंडीला आता कायमचा चाप बसण्याची चिन्हे आहेत.
वाशी, नेरुळ, घणसोली, ऐरोली आणि कोपरखैरणे येथील ५० हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर, आता पुनर्विकासाच्या परवानग्यांचे सर्व अधिकार थेट सिडकोकडे सुपूर्द करण्याच्या हालचालींना राज्य शासनाच्या नगरविकास विभागात वेग आला आहे.
सिडकोकडून पुनर्विकासासाठी आवश्यक सर्व परवानग्या या एक खिडकी योजना सुरू करून देण्याचा निर्णय येत्या आठवड्यात राज्य सरकारकडून घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.
या संदर्भात भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नगरविकास विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता आणि अपर मुख्य सचिव यांना पत्र पाठवून पुनर्विकासासाठी सिडकोमध्ये स्वतंत्र पुनर्विकास विभाग स्थापन करून एक खिडकी योजना सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. शिवसेनेचे नवी मुंबईचे नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनीही मंत्रालयस्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.
गेल्या काही काळापासून नवी मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना राजकीय ग्रहणाचा विळखा बसला आहे. "आमचा मर्जीतील विकासक घ्या, अन्यथा प्रकल्पाला परवानगी मिळणार नाही," अशी भूमिका घेत महासभेच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाकडून विकासक आणि रहिवाशांची कोंडी केली जात असल्याचा गंभीर आरोप आता होत आहे. या मनमानीला न जुमानता नियमानुसार काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही दबाव टाकला जात आहे. या राजकीय साठमारीत शेकडो रहिवाशांचा जीव टांगणीला लागला असून, पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत.
अखेर या जाचाला कंटाळून ५० हून अधिक सोसायट्यांनी आक्रमक पवित्रा घेत शासनाकडे धाव घेतली आहे. पुनर्विकासाच्या सर्व प्रकल्पांचे अधिकार महापालिकेऐवजी सिडकोला देण्यात यावेत, अशी आग्रही मागणी नगरविकास विभागाकडे लावून धरली आहे. सिडकोचे सबळ अधिकार आणि कायदेशीर तरतुदी असलेली महत्त्वाची कागदपत्रेही त्यांनी नगरविकास विभागाकडे सुपूर्द केली आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता पुनर्विकासासाठी विशेष 'एक खिडकी योजना' आणण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील धोकादायक किंवा जीर्ण इमारतींचा पुनर्विकास सिडकोने स्वतः किंवा गृहनिर्माण संस्थांसोबत संयुक्तपणे केल्यास, त्यांना मूळ पुनर्वसन क्षेत्राव्यतिरिक्त १५ टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र मिळण्याचा मार्ग मोकळा आहे.
तसेच, एकापेक्षा जास्त सोसायट्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी ७० टक्के रहिवाशांची संमती आणि रस्ते रुंदीकरणाच्या अटीही यात स्पष्ट आहेत. इतकेच नव्हे, तर उच्च न्यायालयानेही एका महत्त्वपूर्ण निर्णयात सिडकोला परवानगी देण्याचे अधिकार असल्याचे अधोरेखित केले आहे.