कोपरखैरणे : सरत्या वर्षात नवी मुंबई पोलिसांनी देशात सर्वाधिक बदनाम असणारे पंजाब रॅकेट शहरात जम बसवण्यापूर्वीच उद्ध्वस्त केले. आतापर्यंत या रॅकेटशी संबंधित 25 हून अधिक संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून 3 कोटींपेक्षा अधिक रकमेचे हेरॉईन जप्त केले आहे.
जुलै महिन्यात बेलापूर सीबीडी येथील एका लॉज वर वास्तव्यास असलेल्या परमजित महेंद्र सिंग आणि सुखविंदर दारा सिंग यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या कडून 38 ग्रॅम हेरॉईन जप्त केले होते. त्यांच्या चौकशीतून सतनाम सिंग आणि मुकल सिंग, हे पंजाबमधून नवी मुंबईत हेरॉईन आणत असल्याचे समोर आले. त्याचवेळी पंजाबमधून अमली पदार्थ पुरवणारी नवी टोळी कार्यरत असल्याचा संशय आला.
आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखत पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश दिले होते. मागील सहा महिन्यात तळोजा, कळंबोली, सीबीडी, एनआरआय, एपीएमसी या पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल करत 25 पेक्षा अधिक संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 10 आरोपींचा शोध घेतला जात आहे. त्यातील 25 आरोपी हे पंजाब राज्यातील रहिवासी आहेत. 5 गुन्ह्यांत हेरॉईन (वजन 680 ग्रॅम), अफिम (वजन 182 ग्रॅम), कोडीयन सिरप बॉटल (17 नग), 30 मोबाईल व 4 लाख 80 हजार रूपये रोख रक्कम असा एकूण 3 कोटी 31 लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जप्त अमलीपदार्थ पंजाब येथून रेल्वे व रस्ते मार्गे नवी मुंबई येथे येत असल्याचे निष्पन्न झाले. यात कृषी उत्पन्न मालाच्या ट्रकमध्येही अमली पदार्थ आणले गेल्याचे समोर आले आहे. उल्लेखनीय कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे व अमली पदार्थ विरोधी कक्षाने केली आहे.
सुरुवातीला दोन आरोपींना अटक केल्यावर त्यांच्या चौकशीतून पंजाबमधून अमलीपदार्थ येत असल्याचे समोर आले. ही नव्याने आलेली टोळी असून वेळीच पायबंद घालण्याबाबत आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. अद्याप दहा संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.संदीप निगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक