नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत मंगळवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जाहीर करण्यात आली. एकूण 28 प्रभागांतून 111 सदस्यांची निवड केली असून यापैकी तब्बल 56 जागा महिला सदस्यांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ‘महिला सत्तेचा’ ठसा उमटणार आहे.
आरक्षण सोडत प्रक्रियेसाठी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि निवडणूक निर्णय अधिकारी भागवत डोईफोडे आदी पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. सोडतीच्या चिठ्ठ्या शालेय विद्यार्थ्यांकडून काढण्यात आल्या. आरक्षण सोडतीदरम्यान सर्वपक्षीय नेत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, तर इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधुक वातावरण होते. प्रभागनिहाय आरक्षणात अनुसूचित जातींसाठी 10 जागा राखीव असून त्यापैकी 5 महिला जागा आहेत.
अनुसूचित जमातींसाठी 2 जागा (1 महिला, 1 सर्वसाधारण) राखीव ठेवल्या आहेत. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 29 जागा असून त्यापैकी 15 महिला जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गातील 70 जागांपैकी 35 महिला जागा आहेत. नवी मुंबई महापालिकेतील 27 प्रभाग हे चार सदस्यीय असून प्रभाग क्रमांक 28 हा तीन सदस्यीय आहे. एकूण 111 सदस्यांची निवड यंदाच्या निवडणुकीत होणार आहे.
आरक्षण सोडतीनंतर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात येणार असून त्यानंतर अंतिम आरक्षण यादी जाहीर होईल. सन 2011 च्या जनगणनेनुसार नवी मुंबईची लोकसंख्या 11 लाख 36 हजार 170 असून त्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या 1 लाख 839 आणि अनुसूचित जमातींची 19 हजार 646 आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरक्षणात समाविष्ट गटांचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.
सोमवार 17 नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर, सोमवार 17 नोव्हेंबर ते सोमवार 24 नोव्हेंबर (दुपारी 3 वाजेपर्यंत ) आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी आहे. हरकती व सूचना नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील नागरी सुविधा केंद्र अथवा सर्व संबंधित आठ प्रभाग समिती कार्यालय येथे सादर कराव्यात, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
नागरिकांना हरकतीच्या सूचना नवी मुंबई महापालिका तसेच विभाग कार्यालयामध्ये सादर करता येणार आहे. हरकत आणि सूचना घरात घेतल्यानंतर अंतिम आरक्षणाच्या अधिसूचना जारी केली जाणार आहे. ऑनलाईन स्वरुपात व नवी महानगरपालिकेच्या ई-मेलवर पाठवण्यात आलेल्या हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत, असे महापालिका निवडणूक विभागाने स्पष्ट कळविले आहे.
महापालिकेत महिला सदस्यांची संख्या अर्ध्याहून अधिक असल्याने येत्या निवडणुकीत ‘महिला सशक्तीकरणा’चा झंकार उमटणार असून राजकारणातही नव्या चेहऱ्यांची एंट्री होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अनुसूचित जाती प्रभाग क्र. :- 3 (अ), 6(अ), 7(अ), 8(अ), 22(अ)
अनुसूचित जाती (महिला) प्रभाग क्र. :- 1 (अ), 2(अ), 4(अ), 20(अ), 28(अ)
अनुसूचित जमाती प्रभाग क्र. :- 8(ब)
अनुसूचित जमाती (महिला) प्रभाग क्र. :- 6(ब)
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग प्रभाग क्र. :- 2(ब), 4(ब), 5(ब), 6(क), 9(अ), 10(अ), 12(अ), 13(अ), 15(अ), 17(अ),19(अ), 24(अ), 25(अ), 26(अ)
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) प्रभाग क्र. :- 1(ब), 3(ब), 5(अ), 7(ब), 8(क), 11(अ),14(अ), 16(अ), 18(अ), 20(ब), 21(अ), 22(ब), 23(अ), 27(अ), 28(ब)
सर्वसाधारण प्रभाग क्र. :- 1(क), 1(ड), 2(ड), 3(ड), 4(ड), 5(ड), 7(ड), 9(ड), 10(ड), 11(क), 11(ड), 12(ड), 13(ड), 14(क), 14(ड),15(ड), 16(क), 16(ड), 17(ड), 18(क), 18(ड), 19(ड), 20(क), 20(ड), 21(क), 21( ड), 22(ड), 23(क), 23(ड), 24 (ड), 25(ड), 26(ड), 27(क), 27(ड), 28(क)
सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्र. :- 2(क), 3(क), 4(क), 5(क), 6(ड), 7(क), 8(ड), 9(ब), 9(क), 10(ब), 10(क), 11(ब), 12(ब), 12(क), 13(ब), 13(क), 14(ब), 15(ब), 15(क), 16(ब), 17(ब), 17(क),18(ब), 19(ब), 19(क), 21(ब), 22(क), 23(ब), 24(ब), 24(क), 25(ब), 25(क), 26(ब), 26(क), 27(ब).