

माणगाव ः माणगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर - काळे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या उपनगराध्यक्षा पदाचा राजीनामा नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द केला आहे. आता या रिक्त झालेल्या पदावर पुढे कोणाची निवड होणार याची उत्सुकता माणगावकरांना लागून आहे.
हर्षदा सोंडकर - काळे यांनी आपल्या राजीनामा पत्रात असे म्हटले आहे कि, मी ता. 4 ऑक्टोबर 2024 पासून दि. 11 नोव्हेंबर 2025 पर्यंत उपनगराध्यक्ष पदावर कार्यरत आहे. पक्ष नेतृत्वाने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला उपनगराध्यक्षा पदाची ही संधी दिली. त्याबद्दल खा. सुनील तटकरे , राज्याच्या महिला व बालविकासमंत्री ना. आदितीताई तटकरे यांचे विशेष आभार. पक्ष नेतृत्वाने ठरवून दिलेल्या मुदतीत प्रभागातील व शहरातील असंख्य प्रश्न मार्गी लावण्यात मला यश आले. हि संधी प्रदान केली याबद्द्ल पक्ष नेतृत्वाचे पुन्हा एकदा आभार.
पक्ष नेतृत्वाने दिलेली मुदत काही दिवसांत संपुष्टात येत असल्याने मी स्वखुशीने माझ्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. हर्षदा सोंडकर - काळे यांनी आपल्याला मिळालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात माणगाव नगरीच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले. विवीध विकासकामे करण्यात त्या यशस्वी झाल्या. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांची छोटी - मोठी कामेही त्यांनी प्रामाणिकतेनी केली.
मला उपनगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच नगरपंचायतीतील माझे सर्व सहकारी नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी, नगरपंचायतीचे सर्व कर्मचारीवृंद यांनी विशेष सहकार्य करून मला काम करण्याची संधी दिली या सर्वांचे मनापासून आभार व ऋण व्यक्त केले.