नवी मुंबई: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाने तयारी केली असून आठ ठिकाणी स्वतंत्र मतमोजणीची व्यवस्था केली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.
बुधवारी सकाळपासून आठही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मतदान केंद्रांवर नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान यंत्र व मतदान केंद्रावरील साहित्य वितरण केले जाणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतदान साहित्य जमा होणार आहे. या सर्व कार्यालयांमधील स्ट्राँग रुममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे ठेवली जाणार आहेत.
गुरुवारी सकाळी 10 वाजलेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे व त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झालेले आहे. नवी मुंबईकरांनी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि शहर विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.
कुठे कोणत्या प्रभागाची मतमोजणी
माता व बाल रुग्णालय इमारत, दिघा : 01,02,03
सरस्वती विदयालय, से.05, ऐरोली : 04,05,07
समाजमंदिर हॉल, भूखंड क्र.10, सेक्टर-07, घणसोली : 06,08,09
अण्णासाहेब पाटील सभागृह, 1 ला मजला, से.5, कोपरखैरणे : 10,11,12,13
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजमंदिर, प्लॉट नं.187, से.10, सानपाडा : 14,15,19,20
जलतरण तलाव संकुल, भूखंड क्र.196,196 ए, से.12, वाशी : 16,17,18
पहिला मजला, आगरी कोळी भवन, प्लॉट नं.12, से.24, नेरुळ : 21,22,23,24
बेलापूर भवन, सेक्टर .11,सीबीडी : 25,26,27,28