Bribe News Pudhari
मुंबई

Bribe Case: नवी मुंबई पालिका उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात; 42 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

अतिक्रमण विभागात कंत्राटदाराचे देयक मंजूर करण्यासाठी ही लाच त्यांनी मागितली होती.

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे: नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अतिक्रमण उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना 42 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले.

अतिक्रमण विभागात कंत्राटदाराचे देयक मंजूर करण्यासाठी ही लाच त्यांनी मागितली होती. या कारवाईने महानगरपालिका मुख्यालय हादरून गेले असून पालिका मुख्यालयात थेट उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर प्रथमच अशी कारवाई झाली आहे.

अतिक्रमण विभागाची सूत्रे हातात आल्या पासून गायकवाड यांनी शहरात मोठ्या प्रमाणात कारवाई सत्र सुरु केले होते, हे विशेष.या कारवाईसाठी लागणारे साहित्य आणि कामगार हे कंत्राटी घेण्यात येत होते. गेल्या काही दिवसापासून ऐरोली भागात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. कंत्राटदाराने ऐरोली विभागात 15 नोव्हेंबर 2024 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अतिक्रमण हटविण्याची कामे केली.

या वर्षभराच्या कामाचे एकूण दीड कोटींचे बिल थकीत होते. त्यापैकी 21 लाखांचे बिल घेण्यासाठी कंत्राटदार गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करत होता. गायकवाड यांनी बिलाच्या 2 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली.

कंत्राटदाराने दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून लाच लुचपत विभागाने महानगरपालिका मुख्यालयात अतिक्रमण विभागात उपायुक्त गायकवाड यांच्याच केबिनमध्ये सापळा लावला आणि त्यात डॉ गायकवाड 42 हजार घेताना रंगेहाथ पकडले गेले. आता गायकवाड यांचे सर्वच अर्थव्यवहार तपासले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT