मुंबई

Navi Mumbai MIDC: नवी मुंबई एमआयडीसीतील तीन हजार कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर?

दहा लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : राजेंद्र पाटील

आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्र संकटात आले आहे. वायूचा अपुरा पुरवठा त्यातच चीनमधून येणारा कच्चा माल जलवाहतूक बंद झाल्यामुळे अडकून पडला आहे. त्यामुळे सुमारे अडीच ते तीन हजार कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर असून, किमान 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. नवी मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये सुमारे साडेचार हजार लहान-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत.

कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्याच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. तयार असलेला माल निर्यात बंद झाल्याने पडून आहे. येत्या आठवड्यात परिस्थिती बदलली नाही, तर इंजिनीअरिंग आणि प्लास्टिक उत्पादन क्षेत्रातील बहुतांश कारखाने मोठ्या संकटात येतील, अशी माहिती स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष के. आर. गोपी यांनी दिली. दरम्यान, उद्यापासून स्मॉल स्केल इंडस्ट्रीजकडून एमआयडीसीत सर्व्हेला सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ वायूचा परिणाम आहे, असे नाही, तर आयात आणि निर्यात बंद असल्याने कच्चा माल येत नाही. या सगळ्याचा फटका या उद्योगांना बसतो. याबाबत बोलताना के.आर. गोपी म्हणाले, युध्द सुरु झाल्याने प्रत्येक वस्तूचे भाव वाढले आहेत. इंजिनिअरिंग आणि प्लास्टिक उत्पादन क्षेत्रातील बहुतांश या कंपन्यांना लागणारा वायू (गॅस), आयात-निर्यातीवर झालेला परिणाम आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. जर हे युद्ध अजून चार-पाच दिवस कायम राहिले, तर नवी मुंबईतील बहुतांशकंपन्या बंद पडण्याची वेळ येऊ लागली आहे.

जरी इराण आणि इस्रायलमध्ये बॉम्ब पडत असले, तरी त्याचा मोठा आर्थिक बॉम्ब भारतातील उद्योगांवर पडला आहे. उद्योगांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून दररोज कच्च्या मालाचे भाव वाढत आहेत. प्लास्टिक आणि पोलाद (स्टील) उद्योगांना याचा मोठा फटका बसला आहे. निर्यातीसाठीचे साहित्य तयार करून ठेवले आहे, पण ते बाहेर पाठवता येत नाही. तयार माल साठवून ठेवण्यासाठी आता कंपन्यांकडे जागाही शिल्लक नाही. लोखंड कापण्यासाठी लागणाऱ्या वायूचा पुरवठा होत नसल्यामुळे कामगार रिकामे बसून आहेत. माल उपलब्ध आहे, पण तो कापण्यासाठी गॅस नसल्याने काम थांबले आहे. गेल्या आठ दिवसांत स्टेनलेस स्टीलचे भाव प्रतिकिलो 20 रुपयांनी वाढले आहेत, तर साध्या लोखंडाचे भाव 4 रुपये प्रतिकिलोने वाढले आहेत. अशा परिस्थितीत कंपनी चालवणे कठीण झाले आहे.

कामगारांना किती दिवस बसवून पगार द्यायचा?

जर परिस्थिती सुधारली नाही, तर कामगारांना कामावरून कमी करावे लागेल. अनेक कारखान्यांमध्ये सध्या कामगार फक्त बसून आहेत. जे कामगार अविवाहित आहेत. ते बाहेर जेवतात, पण त्यांनाही हॉटेल बंद झाल्यामुळे जेवणाचीही अडचण येत आहे, असे गोपी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT