Navi Mumbai Makar Sankranti Politics Pudhari
मुंबई

Navi Mumbai Makar Sankranti Politics: निवडणूक संपताच मकर संक्रांतीतील राजकीय हळदी-कुंकूला पूर्णविराम

नवी मुंबईत यंदा महिला मेळावे, वाण-वाटप गायब; राजकीय उदासीनतेवर महिलांची नाराजी

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मकर संक्रांतीचा सण म्हणजे केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव न राहता गेल्या काही वर्षांत तो राजकीय हालचालींचे केंद्र बनला होता. विशेषतः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे इच्छूक उमेदवार व स्थानिक नेते महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी हळदी-कुंकू समारंभाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करत असतात. आकर्षक वाण, भेटवस्तू, मनोरंजनाचे कार्यक्रम, महिला मेळावे, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जात असे.

2020 मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका अपेक्षित होत्या. मात्र कोरोना महामारीमुळे राज्यातील सत्तासंघर्ष, न्यायालयीन प्रक्रिया व प्रशासकीय अडचणींमुळे या निवडणुका दीर्घकाळ लांबणीवर पडल्या. या कालावधीत अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीसाठी महिला मतदारांशी संपर्क वाढवला होता. यासाठी संक्रांतीसारख्या सणांचा पुरेपूर राजकीय वापर केला होता. आता मात्र महापालिका निवडणुका पार पडल्या असून पुढील पाच वर्षे निवडणूक नाही. याचा थेट परिणाम यंदाच्या मकर संक्रांतीवर झाल्याचे दिसून आला. संक्रांत सुरू होऊन सहा दिवस उलटून गेले तरी नवी मुंबईतील कोणत्याही प्रभागात राजकीय नेते, पक्ष संघटना किंवा नगरसेवकांतर्फे महिलांसाठी हळदी-कुंकू किंवा विशेष कार्यक्रमांचे आयोजन झाल्याचे चित्र नाही.

निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार स्वाभाविकपणे अशा कार्यक्रमांपासून दूर राहिले आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे निवडून आलेले नगरसेवकही यंदा हळदी-कुंकू किंवा महिला मेळाव्यांकडे पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दरवर्षी संक्रांतीच्या काळात दिसणारी राजकीय गजबज, महिला सहभाग आणि उत्साह यंदा पूर्णपणे गायब आहे. या परिस्थितीमुळे अनेक महिलांमधून नाराजी व्यक्त होत आहे. निवडणूक असते तेव्हा महिलांसाठी कार्यक्रम, भेटवस्तू आणि आश्वासने दिली जातात, मात्र निवडणूक संपताच महिलांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी भावना अनेक महिलांकडून व्यक्त होत आहे.

काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही यावर नाराजी व्यक्त करत, सण-उत्सव हे केवळ मतांसाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून साजरे व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. एकीकडे नवी मुंबई हे सुशिक्षित आणि प्रगत शहर मानले जाते, तर दुसरीकडे महिलांच्या सहभागासाठी असलेले पारंपरिक आणि सामाजिक उपक्रम राजकीय स्वार्थापुरतेच मर्यादित राहिल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. यंदाच्या संक्रांतीत राजकीय हळदी-कुंकू समारंभांना पूर्णविराम मिळाल्याने, पुढील काळात तरी निवडून आलेले प्रतिनिधी महिलांसाठी सामाजिक उपक्रम राबवणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT