Koparkhairane Illegal Food Stalls Pudhari
मुंबई

Koparkhairane Illegal Food Stalls: नवी मुंबईत अनधिकृत फास्ट फूड गाड्यांचा सुळसुळाट

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: स्वच्छता अभियानात संपूर्ण देशातून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या यशाचे कौतुक होत आहे. असे असताना, दुसरीकडे काही भागांमध्ये मात्र अनधिकृत व्यवसाय, अस्वच्छता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.

कोपरखैरणे सेक्टर १८ येथील शिवशंभो रिक्षा स्टँड परिसरातील अनधिकृत फास्ट फूड गाड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबतची तक्रार दिव्यादीप फाउंडेशन, नवी मुंबईचे अध्यक्ष प्रदीप म्हात्रे यांनी केली आहे. या ठिकाणी शिवशंभो रिक्षा स्टँड असला तरी या स्टँडवर रिक्षा दिसून येत नसल्याचे चित्र आहे. मात्र, वाईन शॉपसमोर अनधिकृतपणे फास्ट फूडच्या गाड्या थाटण्यात आल्या आहेत.

मद्यपी वाईन शॉपमधून दारू खरेदी करून या गाड्यांवरून खाद्यपदार्थ घेतात आणि सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे उघड्यावर मद्यप्राशन करत असल्याचे फाउंडेशनचे म्हणणे आहे.

यामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. या अनधिकृत फास्ट फूड गाड्यांवर उघड्यावर खाद्यपदार्थ तळणे आणि भाजण्याचे प्रकार सुरू असतात.

प्रत्येक गाडीवर गॅस सिलिंडरचा वापर केला जात असून, संभाव्य आग किंवा सिलिंडरचा स्फोट झाल्यास बचावकार्य करण्यासाठी आवश्यक अग्निसुरक्षा साधने उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अनधिकृत गाड्या हटवून दिव्यांग व निराधार महिलांना रोजगार द्या!

या परिसरातील शिवशंभो रिक्षा स्टँडची वस्तुस्थिती तपासून त्याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अनधिकृत फास्ट फूड गाड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी दिव्यादीप फाउंडेशनने केली आहे.

याशिवाय, संबंधित जागेचा कायदेशीर व प्रशासकीय विचार करून ती जागा मोकळी झाल्यास दिव्यांग व्यक्ती तसेच विधवा व निराधार महिलांना अधिकृत स्टॉल उपलब्ध करून संधी द्यावी, अशी भूमिकाही फाउंडेशनने मांडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT