पनवेल : विक्रम बाबर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रोडपाली येथे पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या गृहनिर्माण सोसायटीतील सदस्यांसोबतच्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईतील सध्याचे विमानतळ बंद केले जाणार नाही, तर चौथ्या (पालघर) मुंबईतच तिसरे विमानतळ उभारण्यात येईल आणि ते वाढवण बंदर परिसराच्या जवळ असेल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
केवळ विमानतळ विकसित झाल्याने राज्याच्या जीडीपीमध्ये मोठी वाढ होते आणि जवळपास सहा लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्थेमध्ये भर पडतो, असे मत व्यक्त करत मुंबईत केवळ एक रनवे असल्याने आतापर्यंत जीडीपीच्या वाढीवर मर्यादा आल्या होत्या, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर ‘आपला देवाभाऊ काय म्हणता पनवेलकर’ या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या जनसंवाद कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता प्रसाद ओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या संवादात पनवेलमधील सुधारलेले रस्ते, वाहतूक कोंडी, नैना प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतूवरील टोलमाफी, पाणी व्यवस्थापन आणि मालमत्ता कर अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. नैना प्रकल्प हा भविष्याचा ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी पनवेलचा विकास भाजपच्या कारकिर्दीत वेगाने होत असल्याचे सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्टस् सिटी आणि मेडिसिटी अशी अत्याधुनिक शहरे उभारली जात असून, एज्यु-सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची 12 विद्यापीठे येणार आहेत. त्यापैकी सात विद्यापीठांना आधीच परवानग्या मिळाल्या असून, उर्वरित पाच विद्यापीठे परवानगी प्रक्रियेत आहेत, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
नैना प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि एमएमआरडीएद्वारे उभारली जाणारी नवी शहरे यामुळे पनवेलचा विकास ‘थ्री सिक्स्टी डिग्री’ने होत असल्याचे नमूद करत देशातील सुमारे 60 टक्के डेटा सेंटर्स याच विभागात सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉक्टर, उद्योग व्यावसायिक आणि विविध घटकांशी चर्चा करून पनवेल 2030 चे व्हिजन ठरवले जात असून मुंबईनंतर विकसित शहर म्हणून पनवेलची ओळख निर्माण करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या संवादात स्पष्ट केले.
मुंबईत रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली अनेक सोसायट्यांची फसवणूक, प्रकल्प रखडणे आणि रहिवाशांचे हाल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘सेल्फ रिडेव्हलपमेंट’ ही संकल्पना मुंबईकरांसाठी खुली केल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे विकासकांवर अवलंबून न राहता सोसायटी स्वतःच्या माध्यमातून इमारतींचा पुनर्विकास करू शकतात, त्यामुळे आर्थिक पारदर्शकता राखली जात असून रहिवाशांचा थेट सहभाग वाढला आहे. सध्या मुंबईतील सुमारे 1600 इमारती सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत पुनर्विकासाच्या प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. यामुळे रहिवाशांना अधिक दर्जेदार घरे, नियोजनबद्ध सुविधा आणि वेळेत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे. रिडेव्हलपमेंटमध्ये होणारी दलाली, अडचणी आणि फसवणूक थांबवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे.
मालमत्ता कराच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका करत, निवडणूक न जिंकणारे नेते लेखी हमी देऊन काय साध्य करणार, असा सवाल उपस्थित केला. खोटी आश्वासने देऊन मते मागता येतात. पण पनवेलकर त्या आश्वासनांना भुलणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करत भाजप सरकारने आणि पालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांनी 90 टक्के शास्ती कर सवलत देऊन नागरिकांना मोठा दिलासा दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.