नवी मुंबईतील टेकड्या वन विभागाकडे हस्तांतरित करा! pudhari photo
मुंबई

Navi Mumbai hill transfer : नवी मुंबईतील टेकड्या वन विभागाकडे हस्तांतरित करा!

सजग नागरिक मंचची ठाणे आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर हिल, पारसिक हिल, खारघर हिल आणि शहरातील इतर सर्व नैसर्गिक टेकड्या वन विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी सजग नागरिक मंचतर्फे जिल्हाधिकारी ठाणे आणि रायगड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन मंचाने मुख्यमंत्री, वनमंत्री, वन विभागाचे सचिव आणि सिडको , नवी मुंबई महानगरपालिकेला पाठवले आहे.

सजग नागरिक मंचच्या निवेदनानुसार, शहराचे पर्यावरण, जैवविविधता आणि शाश्वत विकास टिकवण्यासाठी या टेकड्यांचे संवर्धन अत्यावश्यक आहे. सध्या या टेकड्यांवर वृक्षतोड, भूमी समतलीकरण, अवैध बांधकामे आणि भूखंड विक्रीचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या हवामान संतुलनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पर्यावरण प्रेमी आणि सदस्य सजग नागरिक मंचचे सदस्य कपिल कुलकर्णी यांनी सांगितले की, नवी मुंबईचे पर्यावरण वाचवणे म्हणजे शहराचे भविष्य वाचवणे होय. शहरातील नैसर्गिक संपदा विकासाच्या नावाखाली नष्ट होऊ नये यासाठी विकासाच्या नावाखाली नवी मुंबईतील नैसर्गिक संपत्तीचे लचके तोडण्याचे प्रकार थांबवण्यासाठीचा एकमेव मार्ग नवी मुंबईतील पाणथळी, कांदळवणे आणि बेलापूर टेकड्यांचे मालकी हक्क सिडको आणि नवी मुंबई पालिकेकडून काढून ते वनविभागाकडे हस्तांतरित करणे हाच आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टेकड्यांचेही संरक्षण व्हावे. मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच सर्व कांदळवन क्षेत्रांना कुंपणाद्वारे सुरक्षित ठेवण्याचे आणि वन विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच धर्तीवर नवी मुंबईतील टेकड्यांचे संवर्धन आणि मालकी हस्तांतरण याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मंचने केली आहे. सजग नागरिक मंचच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या तलावाला ‌‘भूखंड‌’म्हणणे हे पर्यावरणविरोधी कृतीचेच उदाहरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT