नवी मुंबईतील गावठाणांत मसाल्यांचा दरवळ pudhari photo
मुंबई

Drying chilies village culture : नवी मुंबईतील गावठाणांत मसाल्यांचा दरवळ

एकत्रित पारंपरिक मसाला बनविण्याची प्रथा आजही कायम

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबईतील गावठाणांत सध्या वाळवण्यास ठेवलेल्या मिरच्यांसह मसाल्यांचा दरवळ पसरलेला आहे. सर्वत्र अगोठीचा मसाला बनविण्याची लगबग सुरू असून येथील महिलांनी आजही आपली ही प्रथा टिकवून ठेवली आहे.

नवी मुंबईतील दिवाळे कोळीवाडा, नेरुळ, घणसोली, दिघा, कोपरखैरणे, वाशी आणि करावे, बेलापूर येथील मूळ गावांमध्ये सध्या हे चित्र दिसत आहे. आगरी-कोळी मसाल्याबरोबरच येथील महिला सुका मसाला, लाल मसाला, घाटी मसाला, गोडा मसालाही बनवतात. प्रत्येक कुटुंबाची मसाला तयार करण्याची पद्धत वेगळी असली तरी चव आणि परंपरा एकसारखीच जपली जाते.

या मसाल्यांसाठीची मिरची अगोदरच खरेदी करण्यात येते. ती तीन ते चार वेळा उन्हात वाळवली जाते. त्यानंतर त्यात गरम मसाला, धणे, बडीशेप यांसारख्या घटकांचे मिश्रण करून मसाला तयार केला जातो. मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत हे मसाले बनवले जातात. यात मिरची निवडणे, वाळवणे, भाजणे, दळणे आणि योग्य प्रमाणात मिश्रण करणे या सर्व टप्प्यांमध्ये बारकाईने लक्ष द्यावे लागते.

रोजगाराचे साधन

मसाले बनवणे हा केवळ घरगुती उपक्रम न राहता अनेक महिलांसाठी रोजगाराचे साधनही बनला आहे. काही महिला घरगुती मसाले विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत, तर काही जणी ऑर्डरनुसार मसाले तयार करून देतात.

पावसाळ्यापूर्वी तयार केलेल्या घरगुती मसाल्यामुळे स्वयंपाकाला खास चव येते. यामुळे आवर्जून वर्षभर पुरेल एवढे मसाले बनवले जातात.
देवयानी पाटील, स्थानिक ग्रामस्थ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT