नवी मुंबई : महापालिका सार्वत्रिक निवडणूक संपल्यानंतर आज सोमवारी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शहरातील वाढते प्रदूषण बघता यापुढील काळात स्मशानभूमीतील शवदाहिनी ही सीएनजी गॅस अथवा विजेवर चालणारी असणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने महापालिका क्षेत्रातील 29 स्मशानभूमींमध्ये टप्प्याटप्प्याने गॅस व विद्युत शवदाहिनी करणेबाबत कार्यवाही करण्याची सूचना आयुक्तांनी संबंधित विभागाला दिली.
आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सद्यस्थितीत सुरू असलेल्या महापालिकेच्या प्रकल्प व सुविधा कामांचा विभागनिहाय आढावा घेतला.मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात सर्व विभागांची आढावा बैठक झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे व इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
महापालिकेचा सन 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करताना आगामी आर्थिक वर्षात करायच्या नियोजित सुविधा संकल्पांविषयी माहिती जाहीर केली होती. त्या संकल्पांपैकी किती सुविधांची पूर्तता झाली तसेच प्रगतीपथावर असलेल्या सुविधांची सद्यस्थिती काय आहे, याची विभागनिहाय माहिती आयुक्तांनी विभागप्रमुखांकडून घेतली.
नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्तांचा सविस्तर आढावा घेताना सद्यस्थितीत पूर्ण असलेल्या इमारतींचा सुविधा कामांसाठी वापर सुरू करावा. सुविधांसाठी योग्य असलेल्या मालमत्ता ताब्यात घेऊन वापरात आणण्याची तत्पर कार्यवाही करावी.यात सर्व विभागातील बांधून तयार असलेल्या मार्केट इमारतींचे जागा वाटप करून त्या उपयोगात आणण्याची कार्यवाही तत्परतेने करावी, असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. मार्जिनल स्पेस व पदपथ येथील अतिक्रमणे व विनापरवानगी सुरू असलेल्या व्यवसायांवर कारवाईच्या मोहिमा सुरुच ठेवाव्यात.महापालिकेमार्फत 68 लोकसेवांसह महापालिकेच्या आणखी 49 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. देयक भरण्याच्या सर्व ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सर्व विभागांनी आपल्याशी संबंधित सेवांची पूर्तता विहित कालावधीत करण्यासाठी कटीबध्द रहावे, असेही निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले.