Navi Mumbai Crime Report Pudhari
मुंबई

Navi Mumbai Crime Report: नवी मुंबईत गुन्हे वाढले, पण उकल 80 टक्क्यांवर; बेलापूरमध्ये अत्याधुनिक CCTV कमांड सेंटर उभारणार

AI तंत्रज्ञान, ड्रग्ज तस्करांवर धडक कारवाई आणि पोलिसिंगमध्ये डिजिटल मॉनिटरिंगला वेग

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे : नवी मुंबई शहरात 2024 मध्ये 7,739 गुन्हे घडले होते. त्यापैकी 7,835 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. 2025 मध्ये शहरात घडलेल्या गुन्ह्यांचा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला. या वर्षात शहरात एकूण 7,835 गुन्ह्यांची नोंद झाली तर 6,276 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. 2024 मध्ये गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण 77 टक्के होते तर 2025 मध्ये ते 80 टक्क्यांवर जाऊन पोहोचले,अशी माहिती पोलिसांच्या वार्षिक पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे आज वार्षिक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात 2025 च्या कामगिरीचा आढावा सोबत पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.

गुन्हेगारीचा वाढता आलेख कमी करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून बेलापूर येथील सीसीटीव्ही कमांड सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, उरण, खारघर, तळोजा, कळंबोली, अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रातील बसवण्यात आलेल्या सुमारे चार कॅमेऱ्यांवर पोलिसांचा वॉच राहणार आहे, असे भारंबे म्हणाले.

ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात छापेमारी केली. विशेष करून आफ्रिकन ड्रग्ज तस्करांना टार्गेट करण्यात आले. हायड्रो गांजाच्या तस्करीचे रॅकेटही पोलिसांनी उद्ध्वस्त करून मोठ्या संख्येने आरोपी गजाआड केले. नशामुक्त नवी मुंबई करण्यासाठी ड्रग्ज तस्करांवर यापुढेही धडक कारवाई सुरूच राहणार आहे, असे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. याप्रसंगी सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त सचिन सूर्यवंशी, अमित काळे, अनिल कुमार पाटील, रश्मी नांदेडकर आदी उपस्थित होते.

नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दहा बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.बॉडी कॅमेऱ्यामुळे पोलिसांच्या कारवाईत पारदर्शकता राहणार आहे. नवी मुंबईच्या विविध भागांत बीट मार्शलच्या माध्यमातून पेट्रोलिंग सुरू असते. आता या पेट्रोलिंगचे डिजिटल मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. बीट मार्शल संबंधित स्पॉटवर किती वेळा गेला आहे, त्याची माहिती उपलब्ध होणार आहे.

सेंटरमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर

नवी मुंबई शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत चालले आहे. नैना क्षेत्राचाही विकास होत आहे. त्यामुळे पोलीस दलाने बेलापूर येथे सीसीटीव्ही कमांड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या सीसीटीव्ही कमांड सेंटरमध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 1,200, पनवेल महापालिका क्षेत्रातील 1,503, सिडको क्षेत्रातील 521, अटल सेतूवरील 196, पोलीस वाहनांमधील 220 व वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांकडे असलेल्या 10 कॅमेऱ्यांचे मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागांत असलेले हे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे या सीसीटीव्ही कमांड सेंटरला जोडण्यात येणार आहेत. या सेंटरमध्ये एआय टेक्नॉलॉजीचाही वापर करण्यात येणार आहे, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT