नवी मुंबई : नवी मुंबई शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे हॉटेल व खानावळी व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक हॉटेल्सना वेळेवर गॅस उपलब्ध होत नाही. परिणामी, काही हॉटेल्स अंशतः बंद ठेवावी लागत आहेत, तर काही ठिकाणी पूर्णपणे शटर खाली करण्याची वेळ आली आहे.
या तुटवड्याचा थेट परिणाम हॉटेलच्या दैनंदिन कामकाजावर होत असून, मेनू कार्डमधील अनेक पदार्थ हटवण्यात आले आहेत. तर, जे पदार्थ उपलब्ध आहेत, त्यांचे दर वाढवल्यामुळे ग्राहकही हैराण झाले आहेत.
बाजारात सिलिंडरची कमतरता असल्याने काही ठिकाणी काळाबाजार वाढल्याचेही समोर आले आहे. अधिकृत दरापेक्षा अनेक पटीने जास्त दर मोजून व्यावसायिकांना सिलिंडर खरेदी करावा लागत आहे. सध्या एक व्यावसायिक सिलिंडर तब्बल 5 हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे.
या वाढत्या खर्चामुळे हॉटेल चालकांवर आर्थिक ताण वाढला असून, तो ताण कमी करण्यासाठी अनेकांनी मेनूमधील पदार्थांच्या किमतीत सुमारे 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. काही ठिकाणी तर कमी मागणी असलेले किंवा जास्त गॅस लागणारे पदार्थ पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. एकूणच, गॅस तुटवड्यामुळे नवी मुंबईतील हॉटेल उद्योग संकटात सापडला असून, याचा परिणाम थेट ग्राहकांवरही होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा सुरळीत न केल्यास, येत्या काळात अनेक हॉटेल्स बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरांतील 70 ते 75 टक्के हॉटेल व्यवसाय बंद झाल्याने कांद्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे. परिणामी, कांद्याच्या दरातही घसरण झाली आहे. सध्या पांढऱ्या कांद्याला 15 ते 20 रुपये किलो दर मिळत आहे. महाराष्ट्रातील नं. 1 चा कांदा 13 ते 15 रुपये, नं. 2 चा कांदा 10 ते 12 रुपये किलो दराने विकला जात आहे. बिनपातीचा सुका कांदा 6 ते 8 रुपये, तर बिनपातीचा ओला कांदा 4 ते 6 रुपये किलो दराने मिळत आहे.
“गॅस हा आमच्या व्यवसायाचा कणा आहे. सिलिंडरच मिळत नसेल तर व्यवसाय कसा चालवायचा हा मोठा प्रश्न आहे. ग्राहकांना परत पाठवावे लागते. काळ्या बाजारातून महागात सिलिंडर घ्यावा लागतोय. रोजचा खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे आम्हाला दर वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे.रोहित सुर्वे, हॉटेल व्यावसायिक
आम्ही नेहमी जात असलेल्या हॉटेलमध्ये आता अनेक पदार्थ मिळत नाहीत. जे मिळतात त्यांचे दरही वाढले आहेत, त्यामुळे बाहेर जेवणे आता महाग झाले आहे. हॉटेलवाल्यांची अडचण समजू शकतो, पण ग्राहकांवरही याचा ताण येत आहे. कुटुंबासोबत बाहेर जेवायला जाणे आता प्रचंड खर्चिक झाले आहे.सनी धुमाळ, ग्राहक