

मुंबई : केंद्रपुरस्कृत ‘उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी राज्यभर मोठ्या उत्साहात पार पडली. या निमित्ताने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या राज्यभरातील आजी-आजोबांनी रविवारी पुन्हा शाळेची वाट धरली आणि साक्षरतेकडे ठाम पाऊल टाकले.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत विविध सत्रात परीक्षा घेण्यात आली. युडायस प्रणालीअंतर्गत विविध केंद्रांवर मराठीसह हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगाली अशा नऊ भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. मार्चमधील परीक्षेसाठी 1 लाख 23 हजार असाक्षरांनी नोंदणी केली होती. त्यापैकी रविवारी सुमारे एक लाख असाक्षरांनी या चाचणीत सहभाग नोंदवत साक्षरतेकडे वाटचाल सुरू केली.
गावागावांतून आजी-आजोबा शाळेत येऊन बाकांवर बसलेले दृश्य होते. अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच प्रश्नपत्रिका हातात घेतली. काही ठिकाणी नातवंडांनी आपल्या आजी-आजोबांना परीक्षा केंद्रापर्यंत आणले, तर शिक्षकांनीही त्यांना मार्गदर्शन करत त्यांचा आत्मविश्वास वाढवला. परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींचे गुलाबपुष्प देत टाळ्या वाजवून परीक्षार्थींचे स्वागत करण्यात आले.
शालेय शिक्षण विभागाबरोबरच प्रशासनानेही या उपक्रमासाठी विशेष तयारी केली होती. जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांसह विविध अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. शिक्षक, स्वयंसेवक आणि स्थानिक यंत्रणेच्या समन्वयातून परीक्षा सुरळीत पार पडली. ‘उल्लास’ ॲपवर नोंदणी केलेल्या नवसाक्षरांना ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारकडून प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.