PM Modi inaugurates Navi Mumbai International Airport : "नवी मुंबईचे प्रदीर्घ काळाचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुंबईला अखेर दुसरे विमानतळ मिळाले आहे. तसेच या शहराला भूमिगत मेट्रोही मिळाली आहे. भूमिगत मेट्रो हा विकसित भारताचे चित्र आहे. या विकास कामात योगदान देणार्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. नवी मुंबई विमानतळ हे समृद्धी आणि विकासाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.८) व्यक्त केला. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन समारंभानंतर ते बोलत होते.
नवीन विमानतळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी मध्य पूर्व आणि युरोपातील बाजारपेठांशी जोडले जातील. यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि नवीन व्यवसाय आकर्षित होतील. या विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो.महाराष्ट्राचे सुपूत्र दि. बा. पाटील यांचेही स्मरण करतो. त्यांचे कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
विकसित भारताचे काम वेगाने सुरू आहे. जेव्हा पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होत असते तेव्हा भारताचा वेग दिसून येतो.२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर हवाई चपल घालणाराही हवाई सफर करणार, अशी ग्वाही मी दिली होती. यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. २०१४ मध्ये देशात केवळ ७४ विमानतळ होते. आज देशात १६० पेक्षा जास्त विमानतळे आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
आज कौशल्य विकास संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. सध्याचा काळ हा देशातील तरुणाईला विविध संधी उपलब्ध करून देणार आहे. संपूर्ण देश हा विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
विजयादशमी झाली, कोजागिरी झाली, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा, अशा मराठीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
मुंबई ही केवळ आर्थिक राजधानीच नाही तर भारतातील सर्वात गतिमान शहरांपैकी एक आहे. २००८ मध्ये दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केल्यामुळेच हे घडले. परंतु तत्कालीन काँग्रेस सरकारने कमकुवतपणाचा संदेश दिला. अलिकडेच, एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने आणि माजी गृहमंत्र्यांनी खुलासा केला आहे की, मुंबई हल्ल्यानंतर आमचे सुरक्षा दल पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार होते, परंतु दुसऱ्या देशाच्या दबावामुळे, त्यावेळच्या काँग्रेस सरकारने आमच्या सुरक्षा दलांना थांबवले. काँग्रेसने हे सांगायला हवे की परदेशी शक्तीच्या दबावाखाली हा निर्णय कोणी घेतला?, काँग्रेसच्या कमकुवतपणामुळे दहशतवाद्यांना बळकटी मिळाली. देशाला वारंवार जीवांचे बलिदान देऊन या चुकीची किंमत मोजावी लागली आहे. आमच्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा काहीही महत्त्वाचे नाही, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. सध्याचा भारत हा घरात घुसून मारणारा आहे. नुकतेच भारताने राबवले ऑपरेशन सिंदूर त्याचे उदाहरण असल्याचेही पंतप्रधान माेदी यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्ही वर्षानुवर्षे हे विमानतळ होणार असं ऐकायचो. मोदींजींकडे बैठक घेतली आणि 15 दिवसांत विमानतळाच्या कामाला मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात सरकार आल्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या कामाला वेग आला. केवळ काही तासांमध्ये दहा वर्ष झाले नव्हते, ते पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीनंतर झाले. आजचा दिवस स्वप्नपूर्तेचा आहे. या विमानतळामुळे राज्याचा जीडीपी एक टक्क्याने वाढणार आहे"
आठ वर्षांपूर्वी सर्वात मोठ्या एअर पोर्टचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते झाले होते. आज याचे उद्घाटन होत आहे. ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात लागतो, तिथे सोने होते. नवीन भारताचा संकल्प हा मोदींच्या विश्वासाचे प्रतीक आहे. २१व्या शतकात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे स्थान असेल. आता मुंबईची तुला नवी मुंबईशी केली जाईल हा प्रकल्प एक उत्तम उदाहरण आहे. हे विकासकाम केवळ आणि केवळ महायुती सरकारच करू शकते. मेट्रो, नवी मुंबई एअर पोर्ट आणला पण काहींनी मधल्या काळात स्पीड ब्रेकर लावला; पण आमचं सरकार आलं आणि काम सुसाट झालं. आज आमचा शेतकरी संकटात आहे. आम्ही पॅकेज जाहीर केलं आहे. जो शब्द आम्ही दिला होता, तो पाळला आहे, असेही त्यांनी सांगितले. विरोधक म्हणतात, "मोदींनी काय दिले?" मोदींचे हात देणारे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखे भ्रष्टाचार करणारे आहेत, असा टोला लगावत येणाऱ्या निवडणुकीत महायुती विजयी होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी अजित पवार म्हणाले की, आजचा दिवस केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रासाठी मोठा आहे. नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचा प्रवास इतका सोपा नव्हता. तो आता पूर्ण झाला आहे. राज्यात सध्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला साथ देतील. संकटाच्या काळात ते नेहमी महाराष्ट्राला साथ देतात.