मुंबई : येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या मुहूर्तावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी विमाने झेप घेणार असली तरी या नव्या विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या प्रवाशांचा खिसा मात्र चांगलाच कापला जाणार आहे. मुंबई विमानतळाच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळावरून उडणाऱ्या विमानांनी दुप्पट-तिप्पट दर आकारलेले दिसतात. ‘आमची मुंबई’ या इन्स्टा समूहाने एकाच विमानाचे या दोन्ही विमानतळांवरील वेगवेगळे दर जाहीर करून मोठाच धक्का बुधवारी दिला.
प्रवासाची तारीख एक, विमान कंपनी एक आणि जाण्याचे ठिकाणही एकच. मात्र, दरांत मोठी तफावत. उदाहरणार्थ 8 जानेवारी 2026 चे गोव्याचे एकीकडचे तिकीट अकासा एअरवर शोधले असता मुंबईतून हेच तिकीट फक्त 3 हजार रुपयांना बुक करता येत असताना नवी मुंबई विमानतळावरून मात्र पंधरा हजार रुपये मोजावे लागतील.
हा बारा हजार रुपयांचा फरक कशासाठी, याचे उत्तर मिळालेले नाही. नवी मुंबई विमानतळासाठी जनसंपर्क साधणाऱ्या कंपनीच्या लोकांकडेही याचे उत्तर नव्हते. नवी मुंबई विमानतळावरून तिकीट दर जरा जास्त आहेत. आम्ही विमान कंपन्यांशी बोलत आहोत, इतकेच एक जनसंपर्क अधिकारी सांगू शकला.
आणखी एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करण्यासाठी विमान कंपन्यांनी बुकिंग सुरू केले असले तरी त्यांचे तिकीट दर मुंबईपेक्षा चढे आणि शॉक देणारे आहेत. नवी मुंबई विमानतळावर यूजर डेव्हलपमेंट फी जास्त असल्याने काही विमानांचे भाडे अधिक ठेवले गेले आहे, असे सांगण्यात आले.
हे कारण मान्य करावे तर नवी मुंबई विमानतळावरून उडणाऱ्या निरनिराळ्या कंपन्या वेगवेगळे दर कसे आकारतील, याचे उत्तर नाही. नवी मुंबईतूनच उडणारी इंडिगोची विमाने महाग तर अकासाची स्वस्त असाही मामला समोर आला.