नवी मुंबई : उपाययोजना करूनही नवी मुंबईतील हवा गुणवत्ता सुधारत नसल्याने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शहरातील 700 बांधकामांची पाहणी करून त्याचा चार दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश सोमवारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नवी मुंबईतील हवा गुणवत्ता चांगली असावी ही प्रत्येक घटकाची जबाबदारी असून विकासकांकडून मानक कार्यप्रणालीचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास काम बंद करण्यात यावे. त्यानंतरही सुधारणा न केल्यास बांधकाम परवानगी प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल अशी नोटीस द्यावी असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी प्रदूषणाचा आढावा घेतला. बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण व इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी व कार्यकारी अभियंता उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ, सिडको, प्रादेशिक परिवहन विभाग यांचे उच्च अधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिका क्षेत्रातील हवा गुणवत्तेकरिता महानगरपालिकेप्रमाणेच एमपीसीबी, एमआयडीसी, सिडको, आरटीओ, पीडब्ल्यूडी, नॅशनल हायवे ऑथेरिटी, रेल्वे, एमएमआरडीए अशी विविध प्राधिकरणेही जबाबदार असून त्यांच्यामार्फत सुरू असलेल्या बांधकामांठिकाणी हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता महानगरपालिकेमार्फत जारी करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीचे पालन केले जाणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी बैठकीमध्ये स्पष्ट केले.
सर्व बांधकाम साईट्सवर, आरएमसी प्लान्टवर तसेच एमआयडीसी व सिडको प्राधिकारणांनी कामांच्या ठिकाणीही ही यंत्रे बसवून त्वरीत इंटिग्रेटेड करुन घ्यावीत. याबाबतचा अलर्ट एसएमएस साईट सुपरवायझर, डेव्हलपर यांच्या प्रमाणेच महापालिका अधिकारी व पर्यावरण विभाग यांना देण्यात यावा असेही आयुक्तांनी सूचित केले. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट नेिर्देश आयुक्तांनी दिले.