Nariman House Recce pudhari photo
मुंबई

Mumbai Terror Alert : नरिमन हाऊसची रेकी!

Nariman House Recce : नवी मुंबईतून तरुणाला पकडले, विदेशी हँडलर्सशी जुळले धागेदाेरे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : वृत्तसंस्‍था

२६ नोव्‍हेंबर २०११ रोजी झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात टार्गेट राहिलेल्या नरिमन हाऊसची पुन्‍हा रेकी केल्‍याचा प्रकार उघडकीस आल्‍याने खळबळ उडाली आहे. या इमारतीचे फोटो आणि लोकेशन गोळा करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नवी मुंबईच्‍या ऐरोलीतून पकडले आहे. यश सिंह नावाचा हा तरुण विदेशी हँडलर्सच्‍या सांगण्‍यावरून हे कृत्‍य करीत असल्‍याचे उघड झाल्‍याने मुंबई पुन्‍हा एकदा दहशतवाद्यांच्‍या टार्गेटवर असल्‍याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश सिंह विदेशी हँडलर्सच्या सूचनेवरून मुंबईतील अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी करत होता आणि महत्त्वाची माहिती गोळा करून आपल्या संपर्कातील लोकांपर्यंत पोहोचवत होता. तो फोटो काढणे, वाहनांची माहिती गोळा करणे आणि विशिष्ट ठिकाणांचे अचूक लोकेशन मिळवण्याचे काम करत होता. या माहितीमध्ये ज्यू नागरिक, परदेशी नागरिक आणि त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांशी संबंधित माहितीचाही समावेश होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आला संपर्कात यश सिंहचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध असू शकतात, अशी माहिती नवी मुंबई एटीएसला मिळाली होती. विशेष म्‍हणजे तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे काही विदेशी हँडलर्सच्या संपर्कात होता. याचे धागेदोरे केरळमधील त्रिशूर येथे बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा म्हणजेच यूएपीएअंतर्गत दाखल एका गुन्ह्याशी जोडलेले असल्याचे आढळले. यानंतर केरळ पोलिसांचे पथक मुंबईत पोहोचले आणि संयुक्त तपासानंतर यश सिंह याला अटक करण्यात आली.

नरिमन हाऊसवर होती विशेष नजर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवर दक्षिण मुंबईच्‍या कुलाबा परिसरात असलेल्या नरिमन हाऊसची रेकी करण्याची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही इमारत 'छाबाड हाऊस' या नावानेही ओळखली जाते आणि हे एक ज्यू धार्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे. आरोपीला ज्यू नागरिक, त्यांच्या संस्था, परदेशी नागरिक आणि त्यांचे व्यवसाय यांविषयी सविस्तर माहिती गोळा करण्यास सांगण्यात आले होते, असा आरोप आहे.

  • नोव्हेंबर २००८ मध्ये पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या १० दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत येऊन अनेक ठिकाणी हल्ले केले होते. तीन दिवस चाललेल्या या हल्ल्यांमध्ये १६६ जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे ३०० जण जखमी झाले होते.

बेरोजगार तरुण टार्गेट

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी आणि गुन्हेगारी नेटवर्क टेलिग्राम, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप यांसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून बेरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत तरुणांना लक्ष्य करत आहेत. त्यांना पैशांचे आमिष दाखवून रेकी करणे, माहिती गोळा करणे आणि इतर संशयास्पद कामांसाठी तयार केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT