India GDP Growth Pudhari
मुंबई

India GDP Growth: जागतिक आव्हानांच्या काळातही भारताची ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’ सुसाट!

मुंबईतील ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: जागतिक पातळीवर आर्थिक आणि भूराजकीय अनिश्चिततेचे सावट असतानाही भारताची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत असून देश वेगाने प्रगती करीत आहे. खडतर परिस्थितीतही भारताने ७.८ टक्के विकास दर (जीडीपी ग्रोथ) नोंदवून संपूर्ण जगाला एक नवा विश्वास दिला आहे. भारताच्या या आर्थिक कामगिरीमुळे जगभरातील गुंतवणूकदारांचा आणि वित्तीय संस्थांचा भारतीय बाजारपेठेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

भारताची ही ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’ यापुढेही अधिक वेगाने धावत राहील आणि जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान अधिक बळकट करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’च्या मंचावरून ते देश-विदेशातील फिनटेक इनोव्हेटर्स, गुंतवणूकदार आणि उद्योजकांना संबोधित करत होते.

वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’चे उद्‌घाटन मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी केले. यावेळी त्यांनी युनिफाईड पेमेंटस्‌ इंटरफेसच्या म्हणजेच यूपीआयच्या जागतिक विस्तारावर आणि देशातील परिवर्तनावर भर दिला. दशकभरापूर्वी जेव्हा बँक खाती थेट जागतिक आव्हानांच्या काळातही

भारताची ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’ सुसाट!

बोटाच्या टोकावर (फिंगर टिपवर) उपलब्ध होतील असे सांगितले जात होते, तेव्हा कुणाचाही त्यावर विश्वास बसत नव्हता. मात्र तंत्रज्ञान आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावर अशक्य वाटणारे स्वप्न देशात वास्तव बनले असल्याचे मोदी म्हणाले. आज भारत आणि सिंगापूरदरम्यान यूपीआयद्वारे व्यवहार करणे तितकेच सुलभ आणि जलद झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सलग तिसऱ्या वर्षी या परिषदेला उपस्थित राहण्याचा योग आल्याचा उल्लेख करत त्यांनी आपल्या भाषणात ही उपस्थितीची ‘हॅटट्रिक’ असल्याचे सांगितले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सांस्कृतिक आणि फिनटेक क्षेत्रातील ऊर्जा वाखाणण्याजोगी असून वाढती जोखीम पत्करण्याची युवकांमधील क्षमता ‘विकसित भारत’च्या संकल्पाला बळ देत असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, तब्बल तीन दशकांनंतर म्हणजेच ३० वर्षांनंतर जपानच्या नामांकित क्रेडिट रेटिंग एजन्सीने भारताचे सार्वभौम रेटिंग अपग्रेड केले आहे. गेल्या काही वर्षांत देशात राबवलेल्या मॅक्रो इकॉनॉमिक सुधारणा आणि धोरणात्मक निर्णयांमुळेच हे शक्य झाले आहे.

फिनटेक कंपन्यांनी चार प्रमुख सूत्रांवर काम करावे

एकविसाव्या शतकाचा पहिला टप्पा संपून आता देश नव्या तंत्रज्ञान युगात प्रवेश करत असल्याचे सांगत पंतप्रधानांनी फिनटेक उद्योगांसमोर पुढील आव्हाने मांडली. सध्याच्या काळात ‘एजंटिक एआय’, टोकनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञान आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवत आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी फिनटेक कंपन्यांना चार प्रमुख सूत्रांवर काम करण्याचे आवाहन केले. त्यामध्ये एक म्हणजे सायबर सुरक्षेला सर्वोच्च दर्जा देणे, डेटा सुरक्षेचे नैतिक निकष निश्चित करणे, फिनटेक नियामक आणि उद्योगांमधील मजबूत नवोन्मेष परिसंस्था उभारणे, आणि कंपन्यांच्या पारदर्शक मूल्यांकनासाठी फिनटेक ग्राहक संरक्षण निर्देशांक लागू करणे, असे ते म्हणाले.

आर्थिक वृद्धीदरावर भाष्य

जागतिक पातळीवर संघर्ष, अनिश्चितता, ऊर्जा व पुरवठा साखळीवरील दबाव आणि व्यापारातील तणावाचे वातावरण आहे. विशेषत: एप्रिल ते जून हा कालावधी सर्वाधिक आव्हानात्मक ठरला. मात्र अशा स्थितीतही भारताने आपली आर्थिक वाटचाल वेगवान ठेवली. या तिमाहीत भारतानर ७.८ टक्के आर्थिक वृद्धी दर राखला आहे.

भारताची वाढ जगासाठी नव्या आशेचे संकेत देत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताच्या सार्वभौम पतमानांकनातही जागतिक संस्थेने अलीकडेच भारताचे सार्वभौम पतमानांकन ‘ए’ श्रेणीत सुधारले आहे. तब्बल तीन वर्षानंतर अशाप्रकारे देशाच्या पतमानांकनात वाढ झाल्याचे ते म्हणाले.

भारताच्या आर्थिक वाढीचा वेग, व्यापक आर्थिक स्थैर्य आणि गेल्या काही वर्षांतील संरचनात्मक सुधारणांवरील जागतिक विश्वासाचे हे द्योतक असल्याचे सांगतानाच भारताची ही रिफॉर्म एक्स्प्रेस यापुढेही अधिक वेगाने धावणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

यूपीआय भारताच्या फिनटेक क्रांतीचा चेहरा

भारताच्या फिनटेक क्रांतीचा चेहरा असलेल्या ‘यूपीआय’च्या यशाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, २५ ऑगस्ट रोजी स्थापनेची १० वर्षे पूर्ण केलेल्या यूपीआयने देशातील व्यवहारांचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे.

आज देशात एकट्या यूपीआयच्या माध्यमातून दरमहा सुमारे २ हजार कोटी (२० अब्ज) इतके विक्रमी व्यवहार होत असून त्यांचे मासिक मूल्य २५ लाख कोटी रुपयांच्या पार पोहोचले आहे. एवढेच नव्हे तर जगभरात होणाऱ्या एकूण रिअल टाईम डिजिटल व्यवहारांपैकी तब्बल ५० टक्के व्यवहार एकट्या भारतात होतात.

मोदींकडून 'बाप्पांचे' स्मरण

फिनटेकच्या या ऊर्जेसोबतच मुंबईमध्ये सध्या सांस्कृतिक ऊर्जाही शिगेला पोहोचली आहे. काहीच दिवसांत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. आपल्या येथे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी भगवान गणेशाचे स्मरण केले जाते, अशा शब्दात गणरायाला वंदन करत पंतप्रधान मोदी यांनी फिनटेक फेस्टसाठी शुभेच्छाही दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT