

पनवेल : 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग-48 आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग-66, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांबरोबर अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू मार्गावरही टोलमाफी मिळणार आहे. या निर्णयामुळे गणेभक्तांना दिलासा मिळाला आहे. यासह गणेशभक्तांच्या वाहनांसोबत एसटी महामंडळाच्या बसेसनाही टोलमाफी देण्यात येणार आहे
परतीच्या प्रवासातही टोलमाफी
कोकणात जाताना दिला गेलेला पास हा परतीच्या प्रवासासाठीही हा पास ग्राह्य राहणार असून येता जाता असा दोन वेळा टोल माफ होणार आहे. तसचे एसटी बसेसना संबंधित जिल्ह्यातील पोलीस किंवा आरटीओकडून टोलमाफीचे पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पास सुविधा आणि उपलब्धतेबाबत पोलीस व परिवहन विभागाकडून जनजागृती करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने 8 सप्टेंबर 2026 रोजी या संबधित परिपत्रक जारी केले आहे.
या निर्णयानुसार मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग (NH-48), मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. त्याचबरोबर नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू मार्गावरही ही पथकर सवलत लागू करण्यात आली आहे.
‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ पास
टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ या आशयाचे स्टीकर स्वरूपातील पथकरमाफी पास देण्यात येणार आहेत. या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार आहे. परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस विभाग आणि संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी समन्वय साधून हे पास पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या आणि आरटीओ कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
एसटी बसेसनाही टोलमाफी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसनाही या पथकरमाफीचा लाभ मिळणार आहे. ज्या जिल्ह्यांतून गौरी-गणपतीसाठी एसटी बसेस कोकणाकडे रवाना होणार आहेत, त्या जिल्ह्यातील पोलीस विभाग किंवा आरटीओ कार्यालयांकडे आवश्यक पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. संबंधित बसेसना हे टोलमाफी पास लावूनच कोकणाकडे रवाना करण्यात येणार आहेत.