Ashish Shelar Pudhari
मुंबई

Ashish Shelar Tribute to Nana Patekar : मी तुम्‍हाला अजिबात पचणार नाही

लोकसभा निवडणुकीची ऑफर दिल्‍यानंतर नानांनी दिले होते उत्तर : मंत्री शेलार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नाना पाटेकर यांना भाजपने लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली होती. यावेळी नाना पाटेकर हे देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले होते. त्या भेटीत नानांनी, मी तुम्हाला पचणार नाही, अशा आपल्या खास शैलीत उत्तर दिल्याची आठवण सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नानांना आदरांजली वाहताना सांगितली.

६ ऑक्टोबर रोजी त्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याची तयारी दर्शवली होती. यावर चर्चा करण्यासाठी मी ९ ऑक्टोबर रोजी मुंबईत येणार असल्याचे सांगितले होते, पण ती भेट राहूनच गेल्याचे शेलार म्हणाले.

दिवंगत नाना पाटेकर यांच्या विविध पैलूंना उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात फिल्मसिटीच्या वतीने ‘आठवणीतले नाना’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी रवींद्र नाट्य मंदिरात करण्यात आले होेते. यावेळी मान्‍यवरांनी नाना पाटेकर यांना आदरांजली वाहिली.

दादासाहेब फाळके रसास्वाद मंडळाच्या उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमात नाना पाटेकर यांच्या गाजलेल्या ‘प्रहार’ चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेे, ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, जयवंत वाडकर, दिग्दर्शक संजय जाधव, मेहूलकुमार, पुरूषोत्तम बेर्डे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, वर्षा उसगावकर, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील उपस्थित होते.

हिंदी सिनेमात माझे पाय नानामुळे रोवले गेले. माझ्या पत्नीला कर्करोगाचे निदान झाले. पार्थ घोषकडून मला चित्रीकरणात समजावून घेतले, हे फक्त नानाच करू शकतो, त्याने मला सख्ख्या भावासारखे प्रेम दिले, अशा आठवणी शिवाजी साटम यांनी जागवल्या.

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी नाना यांच्याबद्दलच्या आठवणी सांगतांना म्हणाल्या, मी चांगुणा या माझ्या पहिल्या नाटकात काम केले. त्यांच्या फटकळ स्वभावामुळे राग यायचा. पण तो दिलजमाईने नंतर वागायचा. स्टारडम मिळाल्यानंतरही नानामध्ये बदल झाला नाही, वर्षा उसगावकर म्हणाल्या, मी गंमत करत असतो, माझे बोलणे फार गांभीर्याने घेत जाऊ नकोस, अशा तिरंगा चित्रपटाच्या दरम्यानच्या आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज चव्हाण यांनी केले.

नानांचा अभिनय पाहिला आणि रागही पाहिला : मुंढेे

नाना यांचा अभिनय पडद्यावर बघितला, त्यांचा राग बघितला, पण हेच नाना जेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जायचे, तेव्हा त्यांच्यातला माणूस मी पाहिला. २०१५-१६ दुष्काळाच्या वेळी मी सोलापूरचा जिल्हाधिकारी होतो, तेव्हा नाना आणि मकरंद अनासपुरे ‘नाम’च्या कामासाठी आले होते, त्यावेळी मी त्यांची आवर्जून भेट घेतली. आपल्या माणसांना आपण मदत करू शकत नसू, तर आपण कसले माणूस, त्या माणसांच्या मायेचा पदर हजारो, लाखो माणसांपर्यत त्यांनी नेला, शासन सुध्दा इतकं नियोजनबध्द काम करू शकले नसते, असे उद्‍गार अन्‍न आणि औषध महामंडळाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी यावेळी काढले. अलीक़डेच नाना यांनी फोन केला तेव्हा लव्ह यू बाळा... हे शेवटचे वाक्य होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची माझी हिंमत होत नाही, असे तुकाराम मुंढे म्‍हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT