

मुंबई : अन्न-धान्यांच्या दरांपासून स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत प्रत्येक गोष्ट प्रचंड महागल्याने मुंबईतील रेस्टॉरंट्स १० ते १५ टक्के दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. जे सतत बाहेर जेवतात किंवा खातात किंवा ऑनलाईन डिलिव्हरी मागवतात अशा मुंबईकरांना पुढील आठवड्यापासूनच या दरवाढीचा सामना करावा लागू शकतो.
असंख्य मुंबईकरांची दिवसाची सुरूवात सकाळी इडली-सांबारने होते. परिसरातील कोणतेही उडिपी रेस्टॉरंट्स हा त्यांचा गुडमॉर्निंग स्पॉट असतो. जेवणालाही ते साध्या डाळभातावर अवलंबून असतात अशा सर्वच मुंबईकरांना त्यांचे नेहमीचे आवडते मेनूकार्ड दरवाढीचा शॉक देईल. इंडियन हॉटेल्स ॲण्ड रेस्टॉरंट्स असोसिएशन (आहार) या संघटनेने बुधवारीच दहा ते पंधरा टक्के दरवाढीची घोषणा केली.
आहारचे अध्यक्ष विजय शेट्टी म्हणाले, स्वयंपाकाचा गॅस, अन्न-धान्य, जागेचे भाडे, कामगारांचे पगार आणि वाहतुकीचा खर्च असे सारेच महागल्याने रेस्टॉरंट्समधील पदार्थही पुढील आठवड्यापासून महाग होतील. मुंबईतील २५ हजारहून अधिक रेस्टॉरंट्स आणि बार आहारचे सदस्य आहेत. या सर्व ठिकाणचे मेनूकार्ड पुढील आठवड्यात बदलतील. प्रत्येक रेस्टॉरंट्ची दरवाढ ही कमी-अधिक असेल.
उदा. एखाद्या उडपीवाल्याकडे इडली ८० रुपयांना मिळत असेल, तर हा दर ८८ ते ९२ रुपयांपर्यंत जावू शकतो. ९० रुपयांचा साधा डोसा ९९ ते १०४ रुपये मोजून खावा लागेल आणि १६५ रुपयांना मिळणारा मसाला डोसा १८२ ते १९० रुपयांच्या घरात जाईल. कोणतेही रेस्टॉरंट् आपले मेनूकार्डवरील दर वाढवते का आणि वाढवले तर किती वाढवते यावर हे नवे दर अवलंबून असतील.
मुंबईतील रेस्टॉरंट्सनी दीर्घकाळ महागाईचे चटके सहन करत मेनूकार्डचे दर बदलले नाहीत. मात्र महागाई सतत वाढत चालल्याने ही दरवाढ अपरिहार्य आहे. भाजीपाला, डाळी, दूध, डेरी उत्पादन, खाद्य तेल आणि अन्य किराणा सारेच महागले. त्यामुळे आता ग्राहकांवर थोडा बोजा टाकावा लागेल, असे विजय शेट्टी म्हणाले.