Namo Shetkari Yojana Beneficiary updates
मुंबई - नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा निधी लवकरच वितरित होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आला आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, या योजनेतून तब्बल ९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून यासाठी १९३२.७२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. त्यासोबत राज्य सरकार दरवर्षी आणखी सहा हजार रुपये देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवते. त्यामुळे या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण १२ हजार रुपये अनुदान मिळते. आतापर्यंत सहा हप्ते वितरित झाले असून सातव्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत होते. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच निधी जमा होणार आहे.
नवीन निर्णयानुसार, एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीतील हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीकृत आहेत, त्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.
अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. तसेच अतिवृष्टीमध्ये बाधित शेती पिकाचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून इतर कार्यवाही पूर्ण झाल्यावर बाधित शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे.