

मुंबई : पालिकेच्या कूपर रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट वाढला असून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. वार्डांमध्ये पलंगावर, टेबलावर उंदीर मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. त्यातच कंत्राटी कर्मचार्यांचा करार नूतनीकरण न झाल्याने रुग्णालयातील ओपीडी सेवाही विस्कळीत झाली आहे. तर दिव्यांग ओपीडीदेखील तात्पुरती बंद ठेवावी लागली आहे.
सोमवारपासून (दि.2) कूपर रुग्णालयातील ओपीडीमध्ये गोंधळ सुरू आहे. सकाळी आठपासून सुरू झालेल्या रांगा दुपारपर्यंत शेकडो मीटरपर्यंत वाढल्या होत्या. चार तास केवळ केस पेपरसाठी उभे राहिल्यानंतर रुग्णांना डॉक्टर, तपासण्या व औषधे यासाठी आणखी रांगा पार कराव्या लागल्या. त्वचारोग, नेत्ररोग यांसारख्या विभागांची सेवाही या गोंधळामुळे विस्कळीत झाली आहे.
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्राडे यांना पत्र देऊन मनुष्यबळ कमतरतेकडे लक्ष वेधले आहे. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, नोंदणी सहाय्यक, एक्स-रे तंत्रज्ञ, ड्रेसर, अॅम्ब्युलन्स परिचर, फार्मासिस्ट आदी अनेक पदे रिक्त आहेत. या अभावामुळे रुग्णालयातील सेवा विस्कळीत होत असून उर्वरित कर्मचार्यांवर प्रचंड ताण आला आहे. याच पार्श्वभूमीवर नवीन दिव्यांग रुग्णांच्या नोंदणीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून फॉलो-अप रुग्णांनाच सेवा दिली जाणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, महापालिकेने करार नूतनीकरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावला नाही, तर रुग्णालयातील आरोग्यसेवा धोक्यात येईल. रुग्णांचा जीव धोक्यात घालणारी ही ढिलाई त्वरित थांबवून सेवांची व्यवस्था सुधारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नोंदणी कर्मचार्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक रुग्णांना उपचार न मिळताच परत जावे लागले. चार-पाच तास प्रतीक्षा करूनही केस पेपर न मिळाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. माझ्या आईला गुडघ्याच्या दुखण्याचा त्रास आहे. काल दिवसभर उभे राहूनही केस पेपर मिळाला नाही, आज पुन्हा आलो तरी तासन्तास रांगेत उभे राहावे लागले, असे एका रुग्णाच्या मुलाने सांगितले. रुग्णालय प्रशासन मात्र अद्याप गप्पच असल्याने नागरिकांचा आक्रोश अधिक वाढला आहे.