

criminal Babu Mahanto caught by police
नवी मुंबई - पनवेल शहरात काल मध्यरात्री चित्तथरारक घटना घडली. खूनाच्या प्रकरणात अटक होऊन नंतर जामिनावर सुटलेला सराईत गुन्हेगार बाबू मोहंतो याने इमारतीत घुसून जबरदस्तीने खोली बळकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पनवेल पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करताच आरोपीने अचानक शस्त्रांचा मारा सुरू केला.
या हल्ल्यात पनवेल पोलीस ठाण्यातील अस्पतराव, पारधी आणि सम्राट डाकी हे तीन पोलीस जखमी झाले. त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालय, कळंबोली येथे दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, तिघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
आरोपी बाबू मोहंतोकडून १ कुऱ्हाड व १ कोयता जप्त करण्यात आला आहे. घरात त्यावेळी दोन महिला, दोन पुरुष व एक लहान मुलगा असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. त्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी पाण्याचा मारा करून वातावरण नियंत्रणात आणले. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून मोहंतोला ताब्यात घेतले.