Nalasopara cake food poisoning : वाढदिवसाचा आनंद साजरा करत असताना एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. नालासोपारा पूर्वेतील जिजाई नगर परिसरात केकमध्ये थेट पाल आढळल्याने तब्बल ११ जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये ७ लहान मुले आणि ४ प्रौढांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्व बाधितांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, जिजाई नगर येथील एका कुटुंबात शनिवारी सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास वाढदिवसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी नातेवाईक एकत्र जमले होते. वाढदिवसाचा केक कापून सर्वांनी खाल्ल्यानंतर काही वेळातच उपस्थितांना त्रास होण्यास सुरुवात झाली. केकच्या उर्वरित भागाची पाहणी केली असता त्यात पालसदृश अंश आढळल्याने उपस्थितांचे धाबे दणाणले.
केक खाल्ल्यानंतर काही वेळातच लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींच्या पोटात आणि छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. तसेच उलटी, मळमळ आणि जुलाबासारखा त्रास वाढल्याने त्यांना तातडीने नालासोपारा येथील विजयलक्ष्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेवर बोलताना उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, "शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास ११ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. यामध्ये ७ लहान मुले आणि ४ प्रौढ व्यक्तींचा समावेश होता. केक खाल्ल्यानंतर त्यांना केकमध्ये पालसदृश काहीतरी असल्याचे लक्षात आलं. त्यांना उलटी, मळमळ, जुलाब यासारखी लक्षणं सुरू झाली. रुग्णालयात आणताच सर्वांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. सध्या यातील ४ रुग्णांवर अतिदक्षता विभागात (ICU) आणि उर्वरित रुग्णांवर जनरल वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे."
दरम्यान, केकमध्ये पाल नेमकी कशी आली आणि हा केक कोणत्या बेकरीतून आणण्यात आला होता, याचा तपास आता सुरू आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ आणि केक्सची विक्री केली जाते. मात्र, अशा निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) या परिसरातील सर्व बेकरी उत्पादनांची तात्काळ कसून तपासणी करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.