Naigaon BDD Chawl Redevelopment Pudhari
मुंबई

Naigaon BDD Chawl Redevelopment: नायगाव बीडीडी रहिवाशांचे घराचे स्वप्न पूर्ण; 864 कुटुंबांना आज नव्या घरांच्या चाव्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावीवाटप; 160 चौरस फुटांच्या चाळींतून 500 चौरस फुटांच्या नव्या घरांकडे प्रवास

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नायगाव बीडीडी येथील रहिवाशांनी पिढ्यान्‌‍पिढ्या पाहिलेले मोठ्या घराचे स्वप्न अखेर सोमवार दिनांक 16 मार्च रोजी साकार होणार आहे. 864 रहिवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप केले जाणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित असतील.

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत राज्य शासनाच्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. या प्रकल्पांतर्गत नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे ‌‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल‌’ असे नामकरण करण्यात आले आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात दोन पुनर्वसन इमारतीत एकूण 20 टॉवर बांधण्यात येणार आहेत. यात पहिल्या टप्प्याअंतर्गत पुनर्वसन इमारत क्रमांक 1 मधील एकूण 8 टॉवर्सपैकी 5 टॉवर्समधील 864 सदनिकांचा वितरण कार्यक्रम आज होणार आहे.

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या 6.45 हेक्टर जागेवर तळमजला अधिक 3 मजल्यांच्या 42 चाळींमध्ये 3 हजार 344 भाडेकरू वास्तव्यास आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये नायगाव बीडीडी चाळीतील प्लॉट ब मधील 1 हजार 401 रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यापैकी 864 सदनिकांच्या चाव्या आज दिल्या जातील. उर्वरित 537 सदनिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून एप्रिल 2026 मध्ये हे काम पूर्ण होणार आहे.

दुसरा टप्पा

प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्लॉट अ मधील 19 चाळींच्या जागेवर प्रस्तावित 12 पुनर्वसन इमारतींपैकी 3 पुनर्वसन इमारतींचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत चाळींतील रहिवाशांचे तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतरण करण्यात आले आहे. सुमारे दोन ते तीन पिढ्यांपासून 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना म्हाडामार्फत पुनर्वसन इमारतीत 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त 2 बीएचके स्वरुपातील सदनिका मालकी तत्त्वावर विनामूल्य वितरित केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT