Bombay High Court file photo
मुंबई

Murud beach tragedy case: चौदा विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना १० वर्षांनंतर दिलासा; एफआयआर रद्द

२०१६ मध्ये समुद्रात बुडून १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू; पुण्यातील आबेदा इनामदार महाविद्यालयाशी संबंधित विश्वस्त, प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांविरुद्धचा गुन्हा उच्च न्यायालयाने केला रद्द

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर २०१६ मध्ये महाविद्यालयाच्या सहलीदरम्यान १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला.

दुर्घटनेप्रकरणी पुण्यातील आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित विश्वस्त, प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा न्यायालयाने रद्द केला आहे. न्या. मिलिंद एन. जाधव यांनी हा निर्णय दिला.

१ फेब्रुवारी २०१६ रोजी महाविद्यालयाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीसाठी महाविद्यालयातील ११६ विद्यार्थी आणि कर्मचारी गेले होते.

तृतीय वर्षातील ४१ विद्यार्थी दुपारच्या सुमारास समुद्रात उतरले असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. काही विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले; मात्र १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुरुड पोलीस ठाण्यात १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधितांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यावर न्या. मिलिंद जाधव यांनी सुनावणी घेऊन निकाल दिला. या प्रकरणात गुन्हेगारी निष्काळजीपणा सिद्ध करण्यासाठी आरोपींच्या कृतीचा आणि विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा थेट किंवा निकटचा संबंध असणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

केवळ एकाच महाविद्यालयाशी संबंधित असल्यामुळे किंवा सहलीत सहभागी झाल्यामुळे सर्व शिक्षक आणि विश्वस्तांना फौजदारी जबाबदार धरता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT