

मुंबई: अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी आपल्या तीनदिवसीय भारत दौऱ्याची यशस्वी सांगता करताना भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंध आणि ऊर्जा सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत करणे दोन्ही देशांसाठी अत्यंत लाभदायक असल्याचे स्पष्ट केले आहे. २० ते २२ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या दौऱ्यात त्यांनी मुंबई आणि गुजरातमधील जामनगरला भेट देऊन द्विपक्षीय संबंधांना गती दिली.
दौऱ्यादरम्यान मंगळवारी मुंबईत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि मार्को रुबिओ यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या चर्चेदरम्यान व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर हेदेखील उपस्थित होते. याशिवाय पश्चिम आशियातील सद्यस्थितीवरही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला.
२६/११ च्या हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी रुबिओ यांनी मुंबईतील हॉटेल ताजमहाल पॅलेस येथील २६/११ च्या स्मारकस्थळी जाऊन २००८च्या दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप बळींना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यामध्ये मारल्या गेलेल्या ६ अमेरिकन नागरिकांचे स्मरण करताना त्यांनी दहशतवादविरोधी लढ्यातील भारत-अमेरिका कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
मुख्यमंत्री फडणवीस व उद्योगपतींशी संवाद
मार्को रुबिओ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी त्यांना मुंबईच्या ऐतिहासिक 'गेटवे ऑफ इंडिया'चे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगितले.
याशिवाय रुबिओ यांनी अदानी आणि टाटा समूहातील आघाडीच्या उद्योगपतींशी संवाद साधून व्यापार आणि आर्थिक सहकार्याच्या नव्या संधींवर चर्चा केली. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'फ्रीडम २५०' कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.
जामनगर रिफायनरीला भेट आणि ऊर्जा क्षेत्रावर भर
दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात रुबिओ यांनी गुजरातमधील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर रिफायनरीला भेट दिली. तेथे कंपनीच्या उच्च नेतृत्वाशी चर्चा करून ऊर्जा आणि व्यावसायिक भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर दिला.
आर्थिक आणि धोरणात्मक प्राधान्यक्रमांना पुढे नेऊन मी भारताचा निरोप घेत आहे. आर्थिक भागीदारी आणि ऊर्जा सुरक्षा सहकार्य दोन्ही देशांना अधिक सक्षम बनवेल.
मार्को रुबिओ, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री (एक्सवर)