मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप यादीतील अनेक घोळ उघड केल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मांडण्यासाठी आणखी वेळ द्यावा, ही विरोधी पक्षांकडून केलेली मागणी अखेर राज्य निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी आणखी सहा दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. राज्यात मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महापालिकांनी विधानसभा निवडणुकीच्या याद्या जशाच्या तशा घेऊन प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आणि या यादीतील प्रचंड घोळ समोर आले.
दुबार मतदारांची संख्या लाखोंच्या घरात असल्याची तक्रार करत शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदींनी राज्य निवडणूक आयोगाला जबाबदार धरले होते. विरोधकांच्या अनेक प्रभागातील इमारती दुसऱ्या प्रभागात घुसवल्या गेल्या आहेत. काही ठराविक जात-धर्म-भाषा पाहून याद्याची फेरफार करून त्यांना दुसऱ्या वॉर्डात टाकल्याचेही प्रकार घडले. त्यामुळे मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती.
राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी सुधारणेसाठी मुंबईसह सर्व 29 महापालिका प्रशासनांना नवीन वेळापत्रक बुधवारी दिलेे. त्यानुसार प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत 27 नोव्हेंबरऐवजी 3 डिसेंबरपर्यंत असेल. दाखल हरकतींचा निपटारा करून अंतिम मतदार यादी 9 डिसेंबरला जाहीर होईल. मतदान केंद्रांची यादी 14 डिसेंबरला, तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 22 डिसेंबरला जाहीर केली जाईल.