

डहाणू : आम्ही प्रभू श्रीरामाचे अनुयायी असून रावणाची लंका जाळण्याचे काम आम्ही करणार, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या अहंकाराबद्दल केलेल्या वक्तव्याचा हिशेब चुकता केला.
डहाणू नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे) अशी थेट लढत असून भाजप विरुद्ध लढण्यासाठी शिवसेनेला (शिंदे) दोन्ही राष्ट्रवादी आणि महायुतीतील घटक पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे. गेल्या शनिवारी डहाणू येथे प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या माजी नगराध्यक्षांना लक्ष्य करत डहाणूतील एकाधिकारशाही संपवण्ाार, अहंकारी रावणाची लंका जाळणार, असा टोला लगावला होता.
बुधवारी स्थानिक निवडणुकांच्या प्रचारासाठी नागपूरला जाण्यापूर्वी डहाणूत प्रचारसभा घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांना प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही प्रभू श्रीरामाला मानणाऱ्या पक्षात आहोत. आमचा उमेदवार देखील जय श्रीराम वाला आहे. त्यामुळे आम्ही लंकेत राहत नाही. उलट लंका जाळण्याचे काम आम्हीच करणार आहोत. वाढवण बंदर उभारणीमध्ये स्थानिकांना प्राधान्याने रोजगार करून दिला जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.
डहाणू तालुक्यासाठी 1991 मध्ये लागू केलेल्या अधिसूचनेची पुर्नपडताळणी करून आवश्यक बदल केले जातील, असे सांगत त्यांनी डहाणूची निसर्गसंपत्ती अबाधित ठेवण्याचा हेतू व्यक्त केला. पालघर जिल्ह्यात चौथी मुंबई उभी राहील आणि त्यासाठीचे विविध प्रकल्प युद्धपातळीवर सुरू असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
डहाणू, जव्हार, पालघर या नगरपरिषदेवर व वाडा नगर पंचायतीवर भाजपचे नगराध्यक्ष बसतील, असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती पदावरही भाजपच विराजमान होईल, असे ते म्हणाले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेही यावेळी भाषण झाले.