

मुंबई : वैद्यकीय (एमबीबीएस) आणि दंत (बीडीएस) अभ्यासक्रमांच्या जागा पटकवण्यासाठी यावर्षीही नीटमध्ये गुण मिळवलेल्या टॉपर्स विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस लागताना दिसला. एमबीबीएसच्या शासकीय महाविद्यालयांच्या जागांवर 470 ते 504 या सर्वोच्च गुणांवरच थांबले. बीडीएस अभ्यासक्रमांत 440 ते 454 गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यंदा प्रवेश मिळाला. मागास प्रवर्गांपासून ते खुल्या गटापर्यंत सर्वच प्रवर्गात स्पर्धा दिसून आली.
राज्यात महाविद्यालयांची संख्या वाढत असून, प्रवेशही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यंदाच्या वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांच्या प्रवेशात सहा फेरीनंतर राज्यातील एकूण 8 हजार 535 एमबीबीएस जागा भरल्या असून शासकीय महाविद्यालयातील 4 हजार 936 व खासगी महाविद्यालयातील 3 हजार 599 जागा भरल्या आहेत. तर बीडीएस अभ्यासक्रमांतील 2 हजार 718 जागा होत्या, त्यापैकी 2 हजार 711 जागांवर प्रवेश झाले आहेत.
केवळ 7 जागा रिक्त राहिल्या. यापैकी शासकीय महाविद्यालयातील 318 पैकी 312 प्रवेश झाले आहेत. यामुळे तब्बल 6 जागा रिकामी राहिल्या तर खाजगी 2 हजार 400 पैकी 2 हजार 399 प्रवेश झाल्याने एक जागा रिकामी राहिली आहे. या प्रवेशाचे कटऑफ राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले. यातूनही ही चुरस अधोरेखित झाली.
यंदा खुल्या गटात चुरस सर्वाधिक होती. बहुतांश सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 500 ते 504 गुण मिळवलेल्यांनाच प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. राज्यातील अनेक महाविद्यालयांत 501, 503 आणि 504 इतके गुणांवर जागा भरल्याचे चित्र दिसले. जागा कमी आणि राज्यभरातील सर्वच उच्च गुणांच्या विद्यार्थ्यांची पसंती सरकारी महाविद्यालयांना असल्याने खुला गट सर्वाधिक स्पर्धेत राहिला.
इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) 503 गुणांवर कटऑफ थांबला. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने सरकारी महाविद्यालयांकडे कल अधिक होता. तर बीडीएस अभ्यासक्रमांला 419 ते 448 च्या आसपास गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. आर्थिक दुर्बल गटात (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांची परिस्थिती खुल्या गटासारखीच होती. अनेक महाविद्यालयांत 485 व बीडीएसमध्येही 457 इतके गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी जागा भरल्याने या गटाची चुरस स्पष्टपणे जाणवली.
एनटी-डी प्रवर्गात 501 गुणांवर प्रवेश झाले, तर एनटी-बी आणि एनटी-सी गटात 446 ते 501 गुणांची कटऑफ दिसली. व्हीजे गटात 471 गुणांदरम्यान प्रवेश विद्यार्थ्यांना मिळाले. अनुसूचित जाती प्रवर्गातील सरकारी एमबीबीएसमध्ये 419 गुणांवर प्रवेश झाले. अनाथ प्रवर्गात 178 गुणांवर प्रवेश झाले आहेत तर दिव्यांग प्रवर्गात 144 इतके गुणमिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.