Mumbai Rain pudhari photo
मुंबई

Mumbai Rain : पहिल्याच पावसात महापालिकेच्‍या उपाययोजनांवर पाणी

रस्त्यावर पाणीच पाणी, अनेकांचे संसार रस्त्यावर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई या वर्षी तुंबणार नाही असा शब्‍द महापालिका आयुक्‍तांनी मुंबईकरांना दिला होता. मात्र मंगळवारी रात्री झालेल्‍या पहिल्‍याच पावसात मुंबई तुंबली. त्‍यामुळे मुंबई महापालिकेने केलेल्‍या विविध उपाययोजना पावसापुढे फेल ठरल्‍या. ठिकठिकाणी रस्त्यावर लाखो लिटर पाणी तुंबून, मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला तर दुसरीकडे अनेकांचे संसार रस्त्यावर आले. त्यामुळे याला जबाबदार कोण, असा सवाल आता थेट मुंबईकरांकडून केला जात आहे.

पावसाळ्यात मुंबई शहरात पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिका गेल्या दोन ते तीन महिन्यापासून विविध उपयोजना अमलात आणण्यासाठी कार्यरत होती. यात तुंबलेल्या पाण्याचा तातडीने निचरा व्हावा यासाठी पाणीउपसा पंप बसवण्यासह नाले नद्यांची सफाई, पर्जन्य जलवाहिन्यांवरील मेनहोलवर कचरा साचून पाण्याच्या निचऱ्याला अडथळा येऊ नये, म्हणून कचऱ्याची साफसफाई, मेनहोलमधील अडथळे दूर करण्याची कामे करण्यात आली.

पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पाणी तुंबून या उपाययोजना फेल गेल्याचे दिसून आले आहे. नदी-नाले तुडुंब भरलेले नसतानाही मुंबईत पाणी का तुंबले याचा अभ्यास केला असता, बहुतांश मेनहोलवर कचरा अडकल्याचे दिसून आले. दररोज मुंबईतील रस्ते साफ होत असताना हा कचरा आला कुठून असा प्रश्न आता मुंबईकरांना पडला आहे.

अखेर तुंबलेल्या पाण्याचा तातडीने निचरा होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाला मेनहोलवर अडकलेला कचरा साफ करण्यासह काही ठिकाणी मेनहोलची झाकण उघडावी लागली. यासाठी बराच कालावधी लागल्यामुळे मालाड परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसून वित्तहानी झाली. त्यामुळे या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल केला जात आहे.

आर्थिक नुकसानाला पालिका जबाबदार

पहिल्याच पावसात नागरिकांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीला मुंबई महापालिका जबाबदार आहे. महापालिका प्रशासन उपायोजना राबवण्यात कमी पडली असून झालेल्या नुकसानीची भरपाई महापालिकेने करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. दरम्यान नुकसान झालेल्या भागाची महापौर रितू तावडे यांनी पाहणी केली असून झालेल्या नुकसानच अहवाल तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

प्लास्टिक व खाऊच्‍या रॅपर्सचे प्रमाण जास्त

मेनहोलवर अडकलेल्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक पिशव्या व वेफर्स व अन्य खाऊच्या रॅपर्सचे प्रमाण जास्त होते. प्लास्टिक पिशव्या पूर्णपणे अडकून पडल्यामुळे पाण्याचा निचरा थांबला होता. प्लास्टिक पिशव्या काढणे सह शक्य नसल्यामुळे महापालिकेला मेनहोलची झाकण उघडी करणे भाग पडले. त्यामुळे मुंबई शहरात पुन्हा एकदा पातळ प्लास्टिक पिशव्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पातळ प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असताना या पिशव्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या कुठून, असा प्रश्न इयत्ता उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT