

मुंबई: नाल्यातून कितीही गाळ उपसा पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबायचे तेवढे तुंबणारच. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात अधिकाऱ्यांचा बळी जाणारच आहे. त्यात सत्ताधारी भाजपाने पाणी तुंबल्यास केवळ कंत्राटदारच नाही तर त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी जबाबदार असतील, असे जाहिर केले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवरील कारवाई अटळ मानली जात आहे.
मुंबई शहराची भौगोलिक परिस्थिती एखाद्या बशीसारखी आहे. अनेक ठिकाणी समुद्रसपाटीपासून मुंबईतील काही भागांची उंची दीड ते दोन फूट खाली आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस पडत असताना, समुद्राला भरती असल्यास हमखास पाणी तुंबणार आहे.
त्यामुळे नालेससफाई कितीही केली तरी, तुंबणाऱ्या पाण्याला महापालिका रोखूच शकत नाही. त्यामुळे याचा ठपका अधिकाऱ्यांवर ठेवून यंदा त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपाचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी शहरात पाणी तुंबल्यास केवळ कंत्राटदारांनाच नाहीतर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात एक दोन अधिकाऱ्यांचा बळी जाण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्राला भरती असताना शहरातील पाण्याचा निसरा करणाऱ्या पाटमुखावरील सर्व दरवाजे बंद करण्यात येतात. या काळात शहरात मुसळधार पाऊस पडत असल्यास ओहटीपर्यंत शहरातील पाण्याचा निचरा करणे शक्य होत नाही. भरतीच्या वेळी पाण्याचा निचरा करण्यासाठी हाजी अली, ब्रिटानिया, वरळी लव्हग्रोह, क्लिव्हलँड, गझदरबंद हे पंपिंग स्टेशन आहेत. या प्रत्येक पंपाची क्षमता प्रति सेकंदाला ६ हजार लिटर पाण्याचा उपसा करण्याची आहे.
तरी भरतीच्या वेळी शहरात पाणी तुंबते. त्यामुळे नालेसफाई अपूर्ण झाल्याचा ठपका ठेवून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणे योग्य नसल्याचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईकरांच्या समाधानासाठी अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच हे निश्चित मानले जात आहे.
मुंबईतील सखल भाग
सरदार हॉटेल काळाचौकी, दादर परिसर, हिंदमाता, परळ गौरीशंकर, सायन गांधी मार्केट, वडाळा, शिवडी, अंधेरी, मालाड, खार, मिलन सबवे, वीरा देसाई रोड, इर्ला, सांताक्रुझ बस आगार, पाली हिल, गोराई, बोरिवली.
नालेसफाईची पाहणी
मुंबई महानगरपालिकेने १०० टक्के पेक्षा जास्त नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. परंतु ५० टक्केही नाले सफाई झाली नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात स्थायी समितीच्या मार्फत मुंबईतील नालेसफाईची नगरसेवकांच्या तक्रारीनुसार पाहणी करण्यात येणार आहे.