Mumbai Dam pudhari photo
मुंबई

Mumbai Water Storage: मुंबईकरांची चिंता वाढली! मोडक सागरचा पाणीसाठा १३% घटला; पाणीकपात रद्द होण्याची शक्यता लांबणीवर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर तलावातील पाणीसाठ्यात १३ टक्क्यांनी म्हणजेच १४ हजार दशलक्ष लिटर घट झाली आहे. तानसा तलावातील साठ्यातही घट होत असून पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईची पाणीकपात रद्द होण्याची शक्यता लांबणीवर पडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर तलावातील पाणीसाठ्यात १३ टक्क्याने म्हणजे १४ हजार दशलक्ष लिटर्स इतकी घट झाली आहे.

तानसा तलावातील पाणीसाठ्यातही घट होत आहे. तलावांतील घटत्या पाणी साठ्यांमुळे मुंबईतील पाणीकपात रद्द होण्याची शक्यता लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणात तलाव वगळता शहराला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव तुडुंब भरले होते. परंतु पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तलावातील पाणी साठ्यात घट होताना दिसून येत आहे. मोडक सागर तलाव २३ जुलैला तर तानसा तलाव २२ जुलैला ओसंडून वाहू लागला होता.

परंतु मोडक सागरमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होताना दिसून येत आहे. तानसातीलही पाणीसाठ्यात सुमारे दोन हजार दशलक्ष लिटरने घट झाली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षाच्या तुलनेत एकूण पाणीसाठा कमी आहे.

मुंबईतील पाणीटंचाई टाळण्यासाठी तलावांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठ्याची आवश्यकता आहे. २१ सप्टेंबरला तलावातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला असता, सातही तलावांमध्ये १४ लाख १५ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे.

त्यामुळे तलाव भरण्यासाठी अजून ३२ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. २०२५ मध्ये २१ सप्टेंबरपर्यंत अवघ्या १३ हजार दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता होती.

मध्य वैतरणा भरला

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तलावांपैकी ठाणे जिल्ह्यातील महापालिकेच्या मालकीचा मध्य वैतरणा तलावही आता तुडुंब भरला आहे. पण अन्य तलावातील पाणी साठ्यात घट होत असल्यामुळे पाणी टंचाईची टांगती तलवार कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT