मुंबई: तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबई शहराला मे २०२७ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. विशेष म्हणजे भातसा तलावातील पाणीसाठी ६ लाख २० हजार दशलक्ष लिटर्सवर म्हणजे ८७ टक्केवर पोचल्यामुळे मुंबईकरांचे टेन्शन हलके झाले आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडक सागर, तुळशी, विहार, तानसा हे चार तलाव ओसंडून वाहू लागले असून मध्य वैतरणा तलावातील पाणीसाठाही ९१.२१ टक्केवर पोहचला आहे.
विशेष म्हणजे निम्म्या मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. भातसा भरण्यासाठी ९७ हजार दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे. नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावातील पाणीसाठाही ७५ टक्केवर पोहचला आहे. त्यामुळे एकूण पाणीसाठा १२ लाख ७९ हजार दशलक्ष लिटर्सवर पोहचला आहे.
मुंबईला दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे मुंबईला महिना सरासरी १ लाख २३ हजार दशलक्ष लिटर पाणी लागते. सध्याचा तलावातील पाणीसाठा लक्षात घेता मे २०२७ पर्यंत पाण्याचे टेन्शन नाही.
मात्र तलाव भरण्यासाठी अजून सरासरी पावणेदोन लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली असली तरी, सप्टेंबर अखेरपर्यंत तलाव पूर्णपणे भरलेले असणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या तरी शहरात लागू करण्यात आलेली १० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.