Mumbai Water Crisis Pudhari File Photo
मुंबई

Mumbai Water Crisis: पाणीकपात दहा टक्के, बाष्पीभवन 25 टक्के!

अवघ्या 24 तासांत 1 हजार 365 दशलक्ष लिटरचे बाष्पीभवन!

पुढारी वृत्तसेवा

राजेश सावंत

मुंबई: दहा टक्के पाणीकपात करून सध्या मुंबईसह ठाणे व भिवंडीला 3,800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. मात्र प्रत्यक्षात आढावा घेतला असता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्यामध्ये 24 तासांत 5 हजार 165 दशलक्ष लिटर घट झाली आहे. याचा अर्थ 1 हजार 365 दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. हे प्रमाण एकूण पाणीपुरवठ्याच्या 25 टक्के इतके आहे.

गुरुवार 28 मे रोजी सकाळी सहा वाजता तलावातील पाण्याचा आढावा घेतला असता सातही तलावांमध्ये 2 लाख 48 हजार 132 दशलक्ष लिटर इतके पाणी होते. त्यानंतर 24 तासाने म्हणजे शुक्रवार 29 मे सकाळी 6 वाजता सात 2 लाख 42 हजार 967 पाणीसाठा असल्याचे आढळून आले. म्हणजेच 24 तासांत 5 हजार 165 दशलक्ष लिटर पाण्यामध्ये घट झाल्याचे दिसून आले.

पाण्याच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बाष्पीभवनामुळे मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाची झोप उडाली आहे. दररोज 5 हजार दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा झाल्यास येणाऱ्या महिन्याभरात दीड लाख दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाण्यामध्ये घट होणार आहे. त्यामुळे सातही तलावांमध्ये जूनअखेरपर्यंत जेमतेम 80 ते 90 हजार दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT