Mumbai Water Shortage pudhari photo
मुंबई

Mumbai Water Shortage : गिरगाव, मलबार हिल, ताडदेव परिसरांमध्ये तीव्र पाणीटंचाई

कागदोपत्री १०%, प्रत्‍यक्षात काही दिवसांपासून ६०% पाणीकपात?

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य सरकारच्या सूचनेनुसार आणि संभाव्य टंचाईचे नियोजन म्हणून एकीकडे मुंबई महापालिकेकडून संपूर्ण मुंबईत १० % पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे, तर दुसरीकडे दक्षिण मुंबईतील सी आणि डी विभागातील नागरिकांना ६० % पेक्षा जास्त पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अत्यंत कमी दाबाने येणारे पाणी आणि अपुरा पुरवठा यामुळे सी आणि डी विभागातील नागरिकांना पाण्याची किमान गरजा भागवणेही कठीण झाले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील रहिवाशी पाणीटंचाईने त्रस्त झाले असतानाच दिवाळीनंतर पाणीकपातीचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच पाणीकपात व त्यात कमी दाबाने पाणीपुरवठा ही मुंबई शहर व उपनगरात नव्याने समस्या निर्माण झाली आहे. 'सी' वॉर्ड (चंदनवाडी, भुलेश्वर, चिराबाजार) आणि 'डी' वॉर्ड (मलबार हिल, ग्रँट रोड, ताडदेव) हे दक्षिण मुंबईच्या टोकाला असल्याने आणि जुन्या जलवाहिन्यांमुळे अनेक भागात पाणी अतिशय कमी दाबाने किंवा अपुऱ्या वेळेसाठी येत आहे.

भांडुप जलशुद्धीकरण केंद्र आणि विविध जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामांमुळे दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठ्यावर वारंवार परिणाम होत असतो. या दोन्ही विभागातील अनेक सोसायट्या आणि चाळींमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.

तीन दिवसांपासून थेंबभरही पाणी आले नाही

सकाळी येणाऱ्या पाण्याचा दाब इतका कमी असतो की पहिल्या मजल्यावरही पाणी चढत नाही. अनेक इमारतींमध्ये मोटर लावूनही पाणी भरले जात नसल्याची माहिती स्थानिक भागातील रहिवाशांनी दिली. कमी दाबाच्या पाण्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

७४ वर्षीय दिलीप हेगिष्टे यांनी गेल्या तीन दिवसांपासून नळाला एक थेंब भरसुद्धा पाणी आले नसल्याचे सांगितले. पाण्याची गरज मूलभूत गरजांमध्ये मोडत असल्यामुळे पुनर्विकासाची सर्व कामे थांबवण्याची मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे.

या भागात सर्वाधिक झळ

  • डी वार्डमधील फॉकलँड रोड, पी. बी. मार्ग, मौलाना शौकत अली रोड , गिरगाव , ग्रँट रोड, ताडदेव परिसर , सी पी टॅंक परिसर.

  • सी वार्ड मधील नळ बाजार, चोर बाजार, भेंडी बाजार, पायधुनी, कुंभारवाडा आणि काळबादेवी परिसर.

नागरिकांची मागणी

  • महापालिकेने पाणी गळतीचे वास्तविक आकडे तात्काळ सार्वजनिक करावेत.

  • डी आणि सी वार्ड मधील पाणी पुरवठ्याची सखोल चौकशी करून उच्च दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करावा.

  • पाणी चोरी आणि टँकर माफियांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

  • १०% पाणी कपातीच्या नावाखाली ६०% पाणी कपातीची जबाबदारी घेऊन पालिकेने तात्काळ उपाययोजना कराव्यात.

३४% पाण्याबाबत टँकर माफीयांवर संशय

  1. मुंबईत ३४% पाणी हे गळती आणि इतर कारणांमुळे वाया जात असताना पालिका नेमके करते काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. नगरसेवकांनीही पाण्याचे ऑडिटची मागणी केली होती. पण पालिका प्रशासनाकडून त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.

  2. सी, डी विभागात पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होत असून, काही ठिकाणी बेकायदेशीरपणे पाणी दुसरीकडे वळवले जात आहे. पाणी चोरी आणि टँकर माफियांच्या संगनमताशिवाय हे शक्य नाही. विक्रीच्या इमारती मेट्रो, कोस्टल रोड ,रस्त्याचे काँक्रिटीकरण इत्यादी विकासकामांना पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT