

उरण : अक्रोड आयातीमध्ये तब्बल ४४ कोटी रुपयांची सीमाशुल्क (कस्टम ड्युटी) चोरी केल्याप्रकरणी जेएनपीए कस्टम्सच्या केंद्रीय गुप्तचर पथकाने (सीआययू) एका मुख्य आरोपी व्यापाऱ्यास अटक केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे आयातीचा देश चुकीचा दाखवून हा गैरव्यवहार केल्याचा संशय आहे.
अक्रोड आयातीमध्ये ४४ कोटी रुपयांच्या सीमा शुल्काची कथित चोरी केल्याप्रकरणी मुंबई एपीएमसी मार्केटमधील व्यापारी दीपक काकडिया यांना कस्टम विभागाच्या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने (सीआययू) गुरुवारी रात्री मसाला बाजारातील दुकानातून अटक केली. अनेक दिवसांपासून सीआययू त्यांचा शोध घेत होती.
चिलीमधून आयात केलेल्या अक्रोडाची किंमत कमी दाखवून सीमा शुल्काची चोरी केल्याचा आरोप काकडिया यांच्यावर आहे. उपलब्ध तपशिलानुसार, सुमारे ३,६३० मेट्रिक टन अक्रोडाच्या आयातीत प्रत्यक्ष किंमत २.७० डॉलर प्रतिकिलो असताना दुबईतील मध्यस्थ कंपनीच्या बिलांमध्ये ती १.५० डॉलर प्रतिकिलो दाखवल्याचा आरोप आहे. या व्यवहारातून सुमारे ४४ कोटी रुपयांच्या सीमा शुल्काची चोरी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात दीपक ट्रेडिंग कंपनी, आकाश एंटरप्राइजेस, एबीसी एंटरप्राइज, बेस्ट डील ट्रेडर्स आणि स्वस्तिक इंटरनॅशनल या कंपन्यांतील आर्थिक व्यवहारांचा उल्लेख कस्टम विभागाच्या प्रतिज्ञापत्रात आहे.
दीपक ट्रेडिंग कंपनीकडून आकाश एंटरप्राइजेसला सुमारे ५.४४ कोटी रुपये, तर आकाश एंटरप्राइजेसकडून स्वस्तिक इंटरनॅशनलला सुमारे ४.२० कोटी रुपये हस्तांतरित झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणासाठी बनावट ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ प्रमाणपत्रे आणि बनावट 'बिल्स ऑफ लॅडिंग'चा वापर करण्यात आला आहे. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करत ४४ कोटीची सीमाशुल्क चोरी उघडकीस आणली.