Mumbai Water Crisis pudhari photo
मुंबई

Mumbai Water Crisis : मुंबईतील विहिरी शोधा

पाणीचिंता वाढल्याने आयुक्तांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : लांबलेला पाऊस त्यात तलावांतील शिल्लक पाणीसाठा पाहता मुंबई महापालिकेची पाणीचिंता वाढली आहे. महापालिका आयुक्तांनी मासिक आढावा बैठकीत मुंबईतील विहिरींची पाहणी करून सद्यस्थिती तपासण्याचे निर्देश दिले आहेत. नगरसेवकांच्या सहभागातून विहिरींतून परिसरातील गृहसंकुलांना पाणी देता येईल का, याचीही चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक तलाव आटला आहे तरी सहा तलावांत १२ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात हवामान विभागाने पाऊस उशिरा दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने मुंबईकरांना पाणी पुरवायचे कसे, असा पेच प्रशासनापुढे आहे. त्यामुळे शुक्रवारपासूनच पालिका विभागनिहाय विहिरींची पाहणी करून, पाण्याचा वापर करणे शक्य आहे की नाही, विहिरीमध्ये सध्या असलेले पाणी, याचा अभ्यास करून आठवडाभरात अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत वरील निर्देश दिले आहेत.

मुंबईत ८ हजारांपेक्षा जास्त विहिरी

मुंबईत ८ हजारांपेक्षा जास्त विहिरी असून दक्षिण मुंबईत सुमारे २०० ते २५० विहिरी आहेत. यातील पाण्याचा अजूनही वापर केला जात आहे. प्रत्येक चाळींमध्ये अशा प्रकारच्या विहिरी खोदण्यात आल्या असून या विहिरीतील पाण्याचा चाळकरी आजही वापर करत आहेत.

फक्त १२ टक्के पाणीसाठा

११ जून तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

मोडक सागर : ४१,८२८ (३२%)

तानसा : १०,३६८ (७%)

मध्य वैतरणा : २८,०२२ (१४%)

भातसा : ८१,२५२ (१४%)

विहार : १२,०११ (४३%)

तुळशी : १,९८४ (२४%)

एकूण : १,७५,४६५ (१२%)

वाढती लोकसंख्या व हवामानातील बदलांमुळे पाणी व्यवस्थापन आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळे विहिरी तसेच कूपनलिकांची अद्ययावत माहिती सहायक आयुक्तांनी संकलित करण्यास सांगितले आहे.गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेऊन या पाण्याचा वापर करावा. यासाठी स्थानिक नगरसेवक, प्रशासन आणि गृहनिर्माण संस्था यांनी समन्वय साधावा.
अश्विनी भिडे आयुक्त, मुंबई महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT