Garbage Pudhari File Photo
मुंबई

Mumbai Waste Management: कचरा विल्हेवाट मुंबईतच अपरिहार्य; प्रक्रियेसाठी गोराई, मुलुंडचाही पर्याय

कांजूर डम्पिंग ग्राउंडचे कंत्राट २०३६ मध्ये संपणार असले तरी त्याचा वापर थांबण्याची शक्यता धूसर आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुलुंड: मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण आणि विल्हेवाटीसाठी जागेची कमतरता या बाबी लक्षात घेता कांजूरमार्ग आणि देवनार डम्पिंग ग्राउंडवरच कचऱ्याची विल्हेवाट लावणे अपरिहार्य आहे. भविष्यात मुलुंड आणि गोराई येथेही कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या पर्यायाची चाचपणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईत दररोज निर्माण होणारा सुमारे सात हजार मेट्रिक टन कचरा कांजूरमार्ग या एकमेव डम्पिंग ग्राउंडवरच टाकला जातो. कांजूर डम्पिंग ग्राउंडचे कंत्राट २०३६ मध्ये संपणार असले तरी त्याचा वापर थांबण्याची शक्यता धूसर आहे.

ते हटविण्यासाठी ‘’वनशक्ती’’ पर्यावरण संस्था, कन्नमवार नगर असोसिएशन आणि विक्रोळीकर विकास मंच गेल्या काही वर्षांपासून न्यायालयात लढा देत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत अनेक सुनावण्या झाल्या आहेत.

हे डम्पिंग ग्राउंड बंद करावे, या उच्च न्यायालयाच्या आदेशाला मुंबई महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयाकडे आले आहे. कांजूर डम्पिंगबाबत पालिकेने संबंधित कंपनीबरोबर केलेला करार २०३६ मध्ये संपुष्टात आल्यावरही हे डम्पिंग ग्राउंड बंद होणार नाही.

कांजूर डम्पिंग ग्राउंड हटविण्याच्या मागणीसाठी न्यायालयीन लढा सुरू आहे. हे डम्पिंग वन खात्याच्या जागेवर आहे, असा याचिककर्त्यांचा मुद्दा आहे. याप्रकरणी ‘वनशक्ती’च्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी शिल्लक आहे.

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, कांजूर डम्पिंगची जागा वन खात्याची असल्याचे सिद्ध झाले, तर मात्र या जागेवरून डम्पिंग हटू शकते. हे डम्पिंग लगेच बंद करणे ही अत्यंत जिकिरीची प्रक्रिया आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT