Digital Arrest  file photo
मुंबई

Digital Arrest Scam: पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाने ५ कोटींची फसवणूक

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून व्हिडीओ कॉल; सोने गहाण ठेवून पैसे पाठवण्यास भाग पाडले

पुढारी वृत्तसेवा

कुर्ला: डिजीटल अटकेची भीती दाखवत वडाळा येथील एका ७५ वर्षीय महिलेची सायबर भामट्यांनी तब्बल ५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे -पाटील यांच्या नावाने ही फसवणूक करण्यात आली असून याबाबत सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डिजिटल अटकेची भीती दाखवत मोठ्या ?प्रमाणात ही फसवणूक सध्या देखील सुरू आहे.

वडाळा परिसरात एकट्याच राहणाऱ्या वीणा गोस्वामी (वय ७५) यांना देखील सायबर भामट्यांनी अशाच प्रकारे डिजिटल अटकेची भीती दाखवत ४ कोटी ७० लाखांची फसवणूक केली. काही दिवसांपूर्वी त्यांना एका अनोळखी इसमाने फोन केला.

फोन करणाऱ्या इसमाने आपण नाशिक पोलीस ठाणे येथून बोलत असल्याचे सांगत तुमच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांने आपल्यासोबत आयपीएस विश्वास नागरे पाटील बोलणार असल्याचे सांगितले.

पोलीस वर्दीमध्ये आरोपीनी महिलेला व्हिडीओ कॉल केला होता. त्यामुळे ते खरे पोलीस असल्याचा विश्वास महिलेला झाला होता. याच वेळी या दोन्ही आरोपींनी महिलेला अटक करण्याची भीती दाखवत तिच्याकडे असलेले सोने आणि पैशाचा हिसाब देण्यास सांगितले.

महिलेकडे तिच्या आईचे अनेक जुने दागिने होते.महिलेने ही दागिने आरोपीना दाखवले. आरोपींनी तत्काळ हे दागिने सोनार अथवा कर्ज देणाऱ्या बँकेत गहाण ठेवण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने ४ कोटी ७० लाखात हे दागिने एका खासगी बँकेत गहाण ठेवले.

त्यानंतर आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यात एकूण ४ कोटी ७० लाख रुपये पाठवले. काही दिवसातच हे पैसे पुन्हा घरी मिळतील असे अशी बतावणी या आरोपीनी महिलेला दिली होती..मात्र अनेक दिवस उलटल्यानंतर देखील कोणीही हे पैसे घेऊन घरी आला नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे महिलेच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT