BMC Election 2025 Pudhari
मुंबई

BMC ELECTION 2026 : मुंबईत मतमोजणीच्या ‘पाडू’ यंत्रणेवर विरोधकांचा आक्षेप, नेमकं कारण काय?

मतमोजणीवेळी अडचण आली तरच ‘'प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट'’चा वापर : आयोगाची स्पष्टोक्ती

पुढारी वृत्तसेवा

BMC Election Congress objects to PADU

मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र यावर आता विरोधी पक्षाने आक्षेप घेतला आहे. या यंत्राचा खुलासा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

विरोधकांना संपवण्यासाठी अशा प्रकारच्या यंत्राचा वापर : विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेसाठी असा स्वतंत्र अधिकार आहे का, मतमोजणीत 'प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट' अशा प्रकारची यंत्रणा राबविण्यापूर्वी राजकीय पक्षांबरोबर चर्चा करणे आवश्यक होते. अशा प्रकारच्या यंत्राचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी होत आहे. विरोधकांची मते चोरण्यासाठी होणार आहे. विरोधकांची मते फिरवण्यासाठी होणार आहे. काय नेमकं आहे आणि म्हणून या संदर्भात आम्ही सुद्धा आजच निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आहोत. उद्या कोणत्याही परिस्थितीत याचा खुलासा झाल्याशिवाय या यंत्राचा वापर करू नका, अशी आमची भूमिका असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाबद्दल संशय नको : राहुल शेवाळे

यासंदर्भात निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर नवीन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दिले आहे. आता ही कार्यप्रणाली अमलात आणण्यासाठी निवडणूक आयोगाने नियमांचे पालन केलेले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल संशय व्यक्त करू नये. विरोधकांना पराभव दिसून आलेला आहे. त्यामुळे पराभव दिसून आल्यामुळे आज देवाच्या धावा करत आहेत, मंदिरात जात आहेत, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.

.... तरच ‘पाडू’चा वापर : आयोगाची स्पष्टोक्ती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरीत्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

केवळ बृहन्मुंबई महानगरपालिका मतमोजणीसाठीच वापर

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची मतदान यंत्रे केवळ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच वापरली जात आहेत. ही यंत्रे भारत निवडणूक आयोगाची असून ती ‘एम3ए’ या प्रकाराची आहेत. त्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी कंट्रोल युनिटला (सीयू) बॅलेट युनिट (बीयू) जोडूनच करावी. फक्त तांत्रिक अडचण आली तरच अत्यंत अपवादात्मकरीत्या ‘पाडू’चा वापर करावा, असे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत.

केवळ १४० 'प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट'ची उपलब्धता

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी १४० ‘पाडू’ची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत मतमोजणीसाठी पाडूची गरज भासल्यास बेल कंपनीच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीत त्याचा वापर करावा. त्याचबरोबर पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT