मुंबई : भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार कामगिरी केली आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण पदक आणि 2 कांस्य पदकांची कमाई करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
मूलभूत शास्त्रे आणि सामाजिक शास्त्रे गटात 2 सुवर्ण पदके आणि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि आरोग्य विज्ञान गटात 2 कांस्य पदके विद्यापीठास मिळाले आहेत. दोन दिवस चाललेल्या या संशोधन स्पर्धेत पश्चिम विभागीय क्षेत्रातून महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातील एकूण 32 विद्यापीठे या संशोधन महोत्सवात सहभागी झाली होती.
गुजरात येथील सरदार पटेल विद्यापीठात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाने सादर केलेल्या 6 गटांपैकी 4 गटात प्राविण्य संपादन केले आहे. सादर केलेल्या मूलभूत शास्त्रे गटात राहूल मिश्रा या विद्यार्थ्यांने ‘मलेरिआचे नियंत्रण’ हा संशोधन प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक प्राप्त केले. सामाजिक शास्त्रे या गटात तेजस पवार या विद्यार्थ्यांने ‘समाजाच्या विविध परिणामांचा अभ्यास करण्यासाठी इतिहासाचे वर्गीकरण’ या प्रकल्पाचे सादरीकरण करून सुवर्ण पदक प्राप्त केले.
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान गटात ‘अती थंड माध्यमावीणा कार्य करणारे नावीन्यपूर्ण साधन’ या संकल्पनेवरील महेश पुजारी, एकता कदम आणि अमर वर्मा या विद्यार्थ्यांनी सादरीकरण करून कांस्य पदकाची कमाई केली. तर आरोग्य विज्ञान गटात संकेत गुलभिले आणि वर्षा छाब्रिया या विद्यार्थ्यांनी ‘मूत्र विश्लेषक’ या प्रकल्पाचे सादरीकरण करून कांस्य पदक पटकावले.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी सर्व सहभागी आणि विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनसाठी विशेतज्ज्ञ म्हणून डॉ. शशिकुमार मेनन, प्रा. सुनिता शैलेजन, डॉ. मिनाक्षी गुरव, डॉ. भूषण लांगी, डॉ. रुपा राव, डॉ. मनिष देशमुख, डॉ. ललिता मुतरेजा, डॉ. वैशाली निरमळकर, डॉ. प्रज्ञा कोर्लेकर आणि डॉ. रसिका पवार यांनी काम पाहिले. चमू व्यवस्थापक म्हणून डॉ. किर्तीकुमार बडगुजर, डॉ. सुरेखा शेट्टी आणि डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी काम पाहिले.